• Sun. Jun 21st, 2026

Mirrornews24

Marathi News

शासनाचा संत रोहिदास महाराज पुरस्कार जयंती दिनी 5 फेब्रुवारीला होणार जाहीर

ByMirror

Jan 14, 2023

खासदार श्रीकांत शिंदे यांचे मुख्यमंत्र्यांच्या वतीने आश्‍वासन

चर्मकार विकास संघाच्या शिष्टमंडळाची समाजातील विविध प्रश्‍नांवर मुख्यमंत्री यांना निवेदन

अहमदनगर (प्रतिनिधी)- शासनाच्या सामाजिक न्याय विभागाच्या वतीने दिले जाणारे संत रोहिदास महाराज पुरस्कार पुन्हा सुरु करण्याच्या मागणीसाठी चर्मकार विकास संघाच्या शिष्टमंडळाने मुंबई येथे मुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे व खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांची भेट घेऊन निवेदन दिले. तर समाजाच्या विविध प्रश्‍नावर चर्चा केली. यावेळी चर्मकार विकास संघाचे प्रदेशाध्यक्ष संजय खामकर, मुंबई प्रदेश अध्यक्ष सुभाष मराठे, शिवसेना (बाळासाहेबांची) प्रवक्ते माजी मंत्री विजय शिवतारे, प्रवक्ता नरेश म्हस्के, राज्य प्रवक्ते संजीव भोर आदी उपस्थित होते.


शासनाच्या सामाजिक न्याय विभागाच्या वतीने संत रोहिदास महाराज पुरस्कार चर्मकार समाजात निस्वार्थपणे योगदान देणार्‍या व्यक्तींना दिला जातो. संत रोहिदास महाराज यांचा प्रचार, प्रसार करणार्‍या समाज बांधवांना दरवर्षी हा पुरस्कार दिला जातो. परंतु सन 2019 पासून हा पुरस्कार देण्याचे बंद झाले असल्याचे खामकर यांनी निदर्शनास आणून दिले.


संत रोहिदास महाराज यांची जयंती 5 फेब्रुवारी रोजी मोठ्या उत्साहात संपुर्ण देशासह महाराष्ट्रात साजरी करण्यात येणार आहे. जयंतीच्या दिनी संत रोहिदास महाराज पुरस्कार समाजात कार्य करणार्‍या व्यक्तींना दिल्यास समाज बांधवांचा आनंद द्विगुणीत होणार असल्याने बंद झालेले पुरस्कार पुन्हा सुरु करण्याची मागणी चर्मकार विकास संघाच्या वतीने मुख्यमंत्री व खासदार शिंदे यांच्याकडे करण्यात आली.


याबाबत मुख्यमंत्री शिंदे यांनी सामाजिक न्याय विभागाच्या सचिव भांगे यांच्याशी संपर्क करुन बंद झालेले संत रोहिदास महाराज पुरस्कार पुन्हा सुरु करण्यासाठी सूचना केल्या. खासदार शिंदे यांनी देखील याबाबत निर्णय घेऊन जयंती दिनी सदर पुरस्कार जाहीर केले जाणार असल्याचे आश्‍वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वतीने दिले. तर यावेळी चर्मकार समाजाच्या विविध प्रश्‍नासंदर्भात झालेल्या चर्चेत राज्य सरकारच्या वतीने चर्मकार समाजाचे प्रश्‍न सोडविण्याचे आश्‍वासन शिष्टमंडळास देण्यात आले.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *