• Mon. Jun 22nd, 2026

Mirrornews24

Marathi News

अशोकभाऊ फिरोदिया स्कूलच्या फूड फेस्टिवल मध्ये लाखोची उलाढाल

ByMirror

Nov 15, 2022

भारतातीय खाद्य संस्कृतीचे दर्शन

बालदिनानिमित्त रंगला फूड फेस्टिवल व बाल आनंद मेळावा

अहमदनगर (प्रतिनिधी)- विद्यार्थ्यांना व्यवहारिक ज्ञान व फास्टफुडपेक्षा घरगुती सकस आहार मिळण्याच्या उद्देशाने बालदिनानिमित्त अ.ए.सो. च्या अशोकभाऊ फिरोदिया इंग्लिश मीडियम स्कूल व ज्युनियर कॉलेजच्या प्रांगणात फूड फेस्टिवल व बाल आनंद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या फूड फेस्टिवलला पालकांचा उत्स्फुर्त प्रतिसाद मिळून लाखो रुपयांची उलाढाल झाली. तर फूड फेस्टिवलच्या माध्यमातून भारतातील विविध खाद्य संस्कृतीचे दर्शन घडले.
फूड फेस्टिवल व बाल आनंद मेळाव्याचे उद्घाटन संस्थेच्या प्रमुखकार्यवाह छायाताई फिरोदिया यांच्या हस्ते झाले. यावेळी जया प्रकाश गांधी, पुष्पा फिरोदिया, राखी शैलेश मुनोत, मंगल मुनोत, सुरज गुंदेचा, आशा फिरोदिया, चैताली गांधी, शैला चंगेडिया, आशा ईश्‍वर मुनोत, विश्‍वस्त सुनंदाताई भालेराव, विश्‍वस्त अ‍ॅड. गौरव मिरीकर, विद्यालयाचे प्राचार्य प्रभाकर भाबड आदी उपस्थित होते.


बाल दिनानिमित्त रंगलेल्या फूड फेस्टिवल व बाल आनंद मेळाव्यात विद्यार्थ्यांनी उत्सफुर्तपणे सहभाग नोंदवून, विविध खाद्य पदार्थ व मनोरंजनात्मक खेळाचे स्टॉल थाटले होते. विद्यार्थी व पालकांनी हायजीन पध्दतीने घरगुती खाद्य पदार्थापासून पापडी चाट, भेळपुरी, चना चाट, पापडभाजी, फ्रुट सलाद, खाकरा चाट, कुल्फी, स्ट्रॉबेरी स्टीक, सोल कढी, आवळा मुरब्बा, थाळपीठ, इडली-डोसा, वडा पाव, पाव भाजी, छोले भटूरे, चॉकलेट बॉल्स, पिठल भाकरी आदींचे स्टॉल लावले होते. विद्यार्थ्यांनी शेफच्या वेशभुषेत ग्राहकांना खाद्य पदार्थांची विक्री केली. विविध खाद्य पदार्थांचे 145 स्टॉल तर खेळाचे 33 स्टॉल उपलब्ध होते. प्रत्येक स्टॉलवर दोन विद्यार्थ्यांचा सहभाग होता. एलकेजी पासून ते 12 वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना यामध्ये सहभाग नोंदवला.


खाद्य पदार्थांचा आस्वाद घेण्यासाठी शालेय विद्यार्थी व पालकांची झुंबड उडाली होती. खाद्य पदार्थ खरेदीसाठी शाळेच्या वतीने कुपनची व्यवस्था करण्यात आली होती. मात्र मोठ्या प्रमाणात गर्दी वाढल्याने काही तासातच कुपन संपून रोखीने व्यवहार झाले. या सर्व कार्यक्रमात लाखो रुपयांची उलाढाल झाली. सात हजारपेक्षा जास्त पालक वर्गाने कार्यक्रमास भेट देऊन लहान मुलांसह या कार्यक्रमाचा आनंद लुटला.


छायाताई फिरोदिया म्हणाल्या की, शैक्षणिक ज्ञानाबरोबरच व्यवहार ज्ञान देखील गरजेचे आहे. फास्टफुडच्या जमान्यात विद्यार्थी आणि पालकांना सकस आहार व मोबाईलपेक्षा विविध मनोरंजनात्मक खेळाचे महत्त्व समजणे गरजेचे आहे. बालदिनानिमित्त फूड फेस्टिव्हलला अपेक्षेपेक्षा अधिक प्रतिसाद मिळाला. या उपक्रमाद्वारे मुलांना अन्न बनविताना त्यामागे लागणारी कष्टाची जाणीव होणार आहे. तर अन्न वाया जाऊ नये यासाठी देखील ते कटिबध्द राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.

या कार्यक्रमास संस्थेचे उपाध्यक्ष अशोक मुथा, सहकार्य गौरव फिरोदिया, खजिनदार प्रकाश गांधी यांनी या कार्यक्रमाची शिस्त व नियोजनाचे कौतुक करुन विद्यार्थ्यांना बालदिनाच्या शुभेच्छा दिल्या. हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सर्व शालेय शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्‍यांनी परिश्रम घेतले.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *