निमगाव वाघा येथे ज्ञानोबा-तुकोबांच्या जयघोषात रंगला रिंगण सोहळा
फुलांनी सजवलेल्या रथातील पादुकांच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी
अहमदनगर (प्रतिनिधी)- निमगाव वाघा (ता. नगर) येथील श्री नवनाथ पायी दिंडीचे ज्ञानोबा-तुकोबांच्या जयघोषात व टाळ मृदंगाच्या गजरात गुरुवारी (दि.30 जून) श्री क्षेत्र पंढरपुरकडे प्रस्थान झाले. गावात भक्तीमय वातावरणात डोळे दिपवून टाकणारा रिंगण सोहळा पार पडला. या दिंडीत कल्याणच्या भाविकांसह गावाच्या पंचक्रोशीतील वारकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत. दिंडीतील भव्य रथाचे गावात जागोजागी स्वागत करुन भाविकांनी पादुकांच्या दर्शनासाठी गर्दी केली होती.
स्व.पै.किसनराव डोंगरे बहुद्देशीय संस्था व श्री नवनाथ युवा मंडळाच्या वतीने वीणेकरी ह.भ.प. राम महाराज जाधव, ह.भ.प. जयसिंग महाराज मडके, ह.भ.प. विठ्ठल महाराज खळदकर, कल्याणचे ह.भ.प. धुंडा महाराज म्हसकर, राम पवार महाराज यांचा संस्थेचे अध्यक्ष तथा ग्रामपंचायत सदस्य पै.नाना डोंगरे यांनी सत्कार करुन वारीसाठी शुभेच्छा दिल्या.
रथासमोर पै.डोंगरे यांच्या हस्ते नारळ वाढवून दिंडीचे प्रस्थान झाले. यावेळी माजी सरपंच साहेबराव बोडखे, डॉ. विजय जाधव, भागचंद जाधव, पायी दिंडी सोहळा ट्रस्टचे अध्यक्ष एकनाथ डोंगरे, नामदेव फलके, सुनिल जाधव, सदाशिव बोडखे, मारुती फलके, चंद्रकांत जाधव, बन्सी जाधव, भरत बोडखे, नाथा पालवे, अण्णा जाधव, राजेंद्र गोरे, बन्सी जाधव, दत्तू फलके, पोपट भगत, बाळू फलके आदींसह ग्रामस्थ, महिला वर्ग व भजनी मंडळातील सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दिंडीमध्ये सुमारे अडीचशे महिला, पुरुष भाविक सहभागी झाले आहेत. दिंडीच्या अग्रभागी वारकरी संप्रदायाची पताका खांद्यावर घेऊन ज्ञानोबा माऊली तुकारामचा जयघोष करणारे झेंडेकरी, पांढर्या पोशाखात सहभागी भाविक, भजनी मंडळी, फुलांनी सजवलेले रथ व डोक्यावर तुळशी, कळस घेतलेल्या महिला वारीसाठी निघाल्या आहेत. श्री नवनाथ पायी दिंडी केडगाव, अरणगाव, वाळकी, रुईछत्तीसी मार्गे पंढरपुरला जाणार आहे. दिंडीत दररोज हरिपाठ, भारुड, किर्तन व प्रवचनांच्या कार्यक्रमांचा समावेश आहे.