गणराज प्रकाशनच्या वतीने योगेश सोमण यांचा सत्कार; शब्द फुलांची ओंजळतून ग्रामीण संस्कृती, नाती आणि संवेदनांचा हृदयस्पर्शी आविष्कार
ग्रामीण भागातील जीवनमूल्ये, संस्कार आणि संवेदना जपणारे साहित्य समाजासाठी आवश्यक -योगेश सोमण
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- ग्रामीण संस्कृती, माणसांमधील जिव्हाळ्याची नाती, आईचे ममत्व, भक्तीभाव आणि ग्रामीण जीवनातील सहज-सोप्या भावविश्वाचा हृदयस्पर्शी आविष्कार घडविणाऱ्या कवी सखाराम गोरे लिखित व गणराज प्रकाशन प्रकाशित ‘शब्द फुलांची ओंजळ’ या काव्यसंग्रहाचे प्रकाशन अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष, महाराष्ट्र साहित्य परिषद पुणेचे अध्यक्ष तसेच ख्यातनाम अभिनेते, दिग्दर्शक आणि लेखक योगेश सोमण यांच्या हस्ते झाले.
अहमदनगर जिल्हा वाचनालय येथे आयोजित करण्यात आलेल्या या प्रकाशन सोहळ्यास साहित्य, सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवरांची मोठ्या संख्येने उपस्थिती लाभली होती. साहित्य परिषदेच्या अध्यक्षपदी व महामंडळाच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल या कार्यक्रमात गणराज प्रकाशनच्या वतीने योगेश सोमण यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी महाराष्ट्र साहित्य परिषदेचे विभागीय कार्यवाह जयंत येलुलकर, ज्येष्ठ कवी चंद्रकांत पालवे, जिल्हा वाचनालयाचे कार्यवाह विक्रम राठोड, नगर साहित्य परिषदेच्या शिल्पा रसाळ, कवी सखाराम गोरे, प्रकाशक व मसाप जिल्हा प्रमुख प्रा. गणेश भगत, सामाजिक कार्यकर्ते पै. नाना डोंगरे, लेखक सदानंद भणगे यांच्यासह विविध संस्था, साहित्यिक, सामाजिक क्षेत्रातील मान्यवर आणि रसिक वाचक उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात प्रा. गणेश भगत यांनी गणराज प्रकाशनाच्या साहित्यसेवेचा आढावा घेताना सांगितले की, ग्रामीण भागातील होतकरू कवी आणि साहित्यिकांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचे कार्य गणराज प्रकाशन सातत्याने करत आहे. त्यांच्या साहित्याचे प्रकाशन करून ग्रामीण विचार, संस्कृती आणि माणुसकी समाजापर्यंत पोहोचविण्याचे महत्त्वपूर्ण साहित्यिक सांस्कृतिक कार्य प्रकाशन संस्था करत आहे. ‘शब्द फुलांची ओंजळ’ हे गणराज प्रकाशनाचे तब्बल 207 वे पुस्तक असल्याचे त्यांनी सांगितले.
कवी सखाराम गोरे यांच्या साहित्यिक प्रवासाविषयी बोलताना त्यांनी सांगितले की, गोरे हे व्यासंगी साहित्यिक असून हा त्यांचा सातवा काव्यसंग्रह आहे. त्यांच्या कवितांमध्ये जीवनातील सहजभाव, निसर्ग, माणुसकी आणि ग्रामीण जगण्याचे वास्तव अत्यंत प्रभावीपणे उमटले आहे. ग्रामीण मातीतली नाळ त्यांच्या कवितांमधून स्पष्ट जाणवते. त्यांच्या शब्दरचनेत रांगडी बोलीभाषेची गोडी असून ती वाचकांच्या मनाला थेट स्पर्श करते, असेही त्यांनी नमूद केले.
प्रकाशनप्रसंगी बोलताना योगेश सोमण यांनी ग्रामीण साहित्याचे महत्त्व अधोरेखित केले. ग्रामीण भागातील जीवनमूल्ये, संस्कार आणि संवेदना जपणारे साहित्य समाजासाठी अत्यंत आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. सखाराम गोरे यांच्या कवितांमध्ये ग्रामीण जीवनातील वास्तव, नात्यांतील ऊब आणि माणुसकीचा स्पर्श जाणवतो. आजच्या धकाधकीच्या युगात अशा साहित्याची समाजाला अधिक गरज असल्याचेही त्यांनी मत व्यक्त केले.
कवी सखाराम गोरे यांच्या कवितांमध्ये ग्रामीण स्त्रीजीवनाचे अत्यंत प्रभावी चित्रण आढळते. तिचे कष्टमय आयुष्य, घरातील जबाबदाऱ्या, भक्तिभाव, तुळशीला पाणी घालणारी संस्कारशील स्त्री आणि कुटुंबाचा केंद्रबिंदू असलेली चैतन्यमय कारभारीण या विविध रूपांचे चित्रण त्यांच्या कवितेतून जिवंत होते. आईच्या ममत्वाचा आणि त्यागाचा भावनिक आविष्कारही त्यांच्या कवितांमधून प्रकर्षाने जाणवतो.
तसेच भक्तीपर कवितांमधून अध्यात्मिक भावविश्व, तर ग्रामीण संस्कृतीवरील कवितांमधून मातीतला सुगंध अनुभवायला मिळतो. त्यांच्या कविता संवेदनशील, भावस्पर्शी आणि वास्तववादी असल्याने रसिक वाचकांकडून त्यांना विशेष प्रतिसाद मिळत आहे. उपस्थित साहित्यप्रेमींनी कवी सखाराम गोरे यांच्या साहित्यिक कार्याचे कौतुक करत त्यांना शुभेच्छा दिल्या.
