हाऊसिंग सोसायटीची संरक्षक भिंत जेसीबीने पाडली

अहमदनगर (प्रतिनिधी)- मुकुंदनगर येथील सीआयव्ही को. ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीच्या मालकीची संरक्षक भिंत दहशत निर्माण करुन जेसीबीने पाडण्यात आली असून, याप्रकरणी हाऊसिंग सोसायटीने तातडीची विशेष सर्वसाधारण सभा घेऊन भिंत पाडणार्यावर गुन्हा दाखल करण्याची व पुन्हा भिंत बांधण्यासाठी पोलीस संरक्षण मिळण्याबाबत ठराव घेऊन या मागणीचे निवेदन पोलीस अधीक्षकांना देण्यात आले. यावेळी हाऊसिंग सोसायटीचे चेअरमन आरिफ सय्यद, व्हाईस चेअरमन तथा नगरसेवक आसिफ सुलतान, सचिव फिरदोस सय्यद, अन्वर पटेल, फैज खान, जाकिर शेख, मुख्तार इनामदार, नूर सय्यद, सादिक सय्यद, सिराज इनामदार, गालिब मिर्जा आदी हाऊसिंग सोसायटीचे सदस्य उपस्थित होते.
मुकुंदनगर येथील सीआयव्ही को. ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीच्या मालकीची उत्तरेकडील प्लॉट नंबर 33 व प्लॉट नंबर 80 लागून असलेली संरक्षक भिंत गुरुवार दि.17 फेब्रुवारी रोजी शहरातील एका बांधकाम व्यावसायिकाने काही गुंड हाताशी धरुन पाडली. याप्रकरणी बुधवारी (दि.22 फेब्रुवारी) हाऊसिंग सोसायटीची विशेष सर्वसाधारण सभा घेण्यात आली. यामध्ये तोडण्यात आलेली भिंत परत बांधत असताना कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे. भिंत बांधण्यासाठी पोलीस प्रशासनाने सशुल्क पोलीस संरक्षण द्यावे, सर्वे नंबर 324/1 अ व 324/2 ही मालमत्ता शहरातील एका बांधकाम व्यावसायिकाची असून, त्यांच्या सांगण्यावरुन भिंत पाडण्यात आली असून या बांधकाम व्यावसायिकावर गुन्हा दाखल करण्याची मागणी हाऊसिंग सोसायटीच्या वतीने करण्यात आली आहे.
हाऊसिंग सोसायटीचे मंजूर लेआउट प्लॅननुसार सर्व अंतर्गत रस्ते व मुख्य रस्ता सोसायटीच्या मालकीचा असून, सदरील रस्त्यावर बाहेरील कुठल्याही व्यक्तीला या भागात येऊन वहिवाट करण्याचा काहीही अधिकार नसल्याचा विशेष सर्वसाधारण सभेत ठराव घेण्यात आला आहे. सदर संरक्षक भिंत पाडताना जेसीबी घेऊन आलेल्या गुंडांनी खोदलेली चरी बंद केली आहे. त्या ठिकाणी उपस्थित गुंडांनी सोसायटीच्या सभासदांना शिवीगाळ करुन मारहाण करण्याची धमकी दिल्यामुळे सोसायटीच्या सभासदांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले असल्याचे निवेदनात म्हंटले आहे. सीआयव्ही को. ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीच्या मालकीची संरक्षक भिंत दहशत निर्माण करुन जेसीबीने पाडणार्यांवर गुन्हे दाखल करण्याची व संरक्षक भिंत बांधण्यासाठी पोलीस बंदोबस्त देण्याची मागणी करण्यात आली आहे.