तहानल्याला पाणी पाजणे हे मोठे पुण्याचे काम -अतुल फलके
अहमदनगर (प्रतिनिधी)- उन्हाळ्यात दिवसंदिवस वाढती उष्णता व रणरणत्या उन्हात ग्रामस्थांची तहान भागविण्यासाठी निमगाव वाघा (ता. नगर) येथील शहीद चौकात जिल्हा बँक शाखे जवळ मदिना ग्रुपच्या वतीने पाणपोई सुरु करण्यात आली. या पाणपोईचा शुभारंभ एकता फाऊंडेशनचे अध्यक्ष तथा सोसायटीचे संचालक अतुल फलके यांच्या हस्ते झाला. यावेळी यावेळी हुसेन शेख, जावेद शेख, बशीर शेख, चांद शेख, नवाझ सय्यद, सतीश उधार, अक्षय जाधव, बाबूभाई शेख, शकील शेख, विजय गुरव, बाबासाहेब काळे, हबीब शेख, विजय भुसारे, उस्मान शेख, नवाब शेख आदी उपस्थित होते.
प्रास्ताविकात हुसेन शेख यांनी विविध कामानिमित्त वाडी-वस्तीवरील ग्रामस्थ गावात येत असतात. उन्हाळ्यात नागरिकांना पिण्यासाठी पाणी उपलब्ध होण्याच्या दृष्टीकोनाने मदिना ग्रुपने पुढाकार घेऊन पाणपोई सुरु केली आहे. पाणपोईच्या माध्यमातून वाटसरुंना दररोज शुध्द पाणी उपलब्ध होणार असल्याचे स्पष्ट केले.
अतुल फलके म्हणाले की, तहानल्याला पाणी पाजणे हे मोठे पुण्याचे काम आहे. रखरखत्या उन्हात पदचारी पिण्याच्या पाण्याचा शोध घेताना दिसत आहे. सर्वसामान्यांना बंद बाटलीचे पाणी घेणे परवडणारे नसून, सर्वांना पिण्याचे पाणी उपलब्ध होण्यासाठी मदिना ग्रुपने घेतलेला उपक्रम कौतुकास्पद असल्याचे त्यांनी सांगितले.