• Wed. Jun 24th, 2026

Mirrornews24

Marathi News

बोर्डाच्या परीक्षेत विद्यार्थींच्या कॉपी केसला पर्यवेक्षक शिक्षकाला जबाबदार धरु नये

ByMirror

Mar 3, 2023

अहमदनगर जिल्हा माध्यमिक शिक्षक संघाचे माध्यमिक शिक्षण विभागाला निवेदन

शिक्षकांवर चुकीची कारवाई झाल्यास परीक्षा व पेपर तपासणीवर बहिष्कार टाकण्याचा इशारा

अहमदनगर (प्रतिनिधी)- दहावी व बारावी बोर्डाच्या परीक्षेमध्ये विद्यार्थ्यांनी केलेल्या कॉपी केसला पर्यवेक्षण करणार्‍या शिक्षकांना जबाबदार धरु नये, अशा पध्दतीने कारवाई झाल्यास परीक्षा व पेपर तपासणीवर बहिष्कार टाकण्याचा इशारा अहमदनगर जिल्हा माध्यमिक शिक्षक संघाच्या वतीने देण्यात आला आहे.


शिक्षक संघाच्या शिष्टमंडळाने माध्यमिक शिक्षण विभागाला या प्रश्‍नाबाबत शुक्रवारी (दि.3 मार्च) भेट देऊन शिक्षण विभागाचे अधीक्षक सत्यजीत मच्छिंद्र यांना निवेदन दिले. यावेळी जिल्हा माध्यमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष अप्पासाहेब शिंदे, खजिनदार बाळासाहेब निवडुंगे, रामदास शिंदे, बद्रीनाथ शिंदे, अमोल ठाणगे, राहुल झावरे, एस.एस. आंधळे, बी.टी. गुंजाळ, एस.पी. चव्हाण, बी.टी. मखरे, संभाजी गाडे, प्रशांत होन, अलीम शेख, ए.जी. कुमावत, एस.एस. वाळके, बी.ती. कांबळे, जी.ए. पोकळे, डी.एन. बोरुडे आदींसह शिक्षक उपस्थित होते.


सध्या दहावी व बारावी बोर्डाच्या परीक्षा सुरू आहेत. शिक्षक भरती नसल्यामुळे बर्‍याच शाळेची शिक्षक संख्या कमी आहे. त्यामुळे पर्यवेक्षण करणार्‍या शिक्षकांवर शालेय कामकाज व बोर्ड परीक्षेचे अतिरिक्त काम आलेले आहे. बोर्डाच्या परीक्षेत जर विद्यार्थी कॉपी करताना आढळला, तर पर्यवेक्षण करणार्‍या शिक्षकावर कारवाई करण्याची तयारी प्रशासनाने सुरु केली आहे. यामुळे शिक्षकांमध्ये तीव्र नाराजी पसरली असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.


एखाद्या गावात चोरी झाल्यास पोलीस प्रशासनावरच कारवाई करायची का? असा प्रश्‍न शिक्षकांनी उपस्थित केला आहे. पर्यवेक्षण करताना सर्व शिक्षक चोखपणे काम करत असतात. परंतु ज्या विद्यार्थ्यांना कॉपी केली तर तो त्याचा दोष आहे, मात्र त्यामध्ये शिक्षकांना जबाबदार धरुन कारवाई झाल्यास अहमदनगर जिल्हा माध्यमिक शिक्षक संघटनेच्या वतीने उर्वरित पेपरचे सुपरव्हिजन व पेपर तपासणीवर बहिष्कार टाकण्याचा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.


परीक्षेच्या काळात विद्यार्थ्यांचे मनोबल चांगले ठेवण्यासाठी बोलायचे नाही, अशी सूचना बोर्डाने दिलेली आहे. परंतु मागील पाच वर्षाच्या कालावधीत कॉपी करू दिली नाही, म्हणून 38 शिक्षकांवर हल्ले झालेले आहेत. त्यावेळी शिक्षण विभागाने त्यांची दखल देखील घेतली नाही. ज्या पर्यवेक्षकाला मारहाण झाली त्याबाबत साधा गुन्हा देखील दाखल करून घेण्यात आला नाही. कोरोना काळात शिक्षकांनी आरोग्य विभागात काम केले, पोलिसांना मदतीस म्हणून काम केले. अनेक ठिकाणी मनुष्यबळ कमी असल्याने शिक्षकांच्या ड्युटी लावण्यात आल्या. सध्या शिक्षक भरती नसल्यामुळे अनेक शाळेत शिक्षक कमी आहे, त्यामुळे परीक्षेसाठी इतर विभागातील कर्मचार्‍यांची नेमणूक करावी अशी मागणी संघटनेने या अगोदरच केलेली असल्याचे निवेदनात म्हंटले आहे.


बोर्डाच्या परीक्षेमध्ये विद्यार्थ्यांनी केलेल्या कॉपी केसला पर्यवेक्षण करणार्‍या शिक्षकांना जबाबदार धरुन त्यांच्यावर कारवाई करु नये व कमी शिक्षक संख्या असताना परीक्षेसाठी इतर विभागातील कर्मचार्‍यांची नेमणूक करण्याची मागणी अहमदनगर जिल्हा माध्यमिक शिक्षक संघाच्या वतीने करण्यात आली आहे.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *