गावोगावी जाऊन युवकांमध्ये करणार जागृती
सक्षम भारताच्या निर्माणासाठी व्यसनमुक्ती काळाची गरज – सोनू साठे
अहमदनगर (प्रतिनिधी)- सक्षम भारताच्या निर्माणासाठी व्यसनमुक्ती काळाची गरज बनली आहे. स्पर्धेच्या युगात युवक ताणतणाव व निराशेमुळे व्यसनाच्या आहारी जात आहे. कमी वयातच व्यसनाधिन झालेले युवक दिसत असून, व्यसनापासून युवकांना दूर करण्यासाठी जनजागृतीद्वारे मानसिकता बदलण्याची गरज आहे. उमंग फाउंडेशनने नशा मुक्तीसाठी उचललेले पाऊल प्रेरणादायी असल्याचे प्रतिपादन प्रसिद्ध मराठी गायक सोनू साठे यांनी केले.
उमंग फाउंडेशन संचलित संजीवनी व्यसनमुक्ती केंद्राच्या माध्यमातून नशा मुक्ती अभियानाच्या उद्घाटनाप्रसंगी साठे बोलत होते. नशा मुक्ती अभियानाच्या फलकाचे अनावरण करुन या अभियानाची सुरुवात करण्यात आली. यावेळी उमंग फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. संतोष गिर्हे, कोतवालीचे पो. कॉ. अनिल हराळ, चाँद शेख, विशाल साठे, बाळू सोनवणे, ऋत्विक सोनवणे, मनीषा शिंदे, फाऊंडेशनच्या सचिव वैशाली कुलकर्णी, शिला सोनवणे, भगवान बाणकर, शुभम साळवे, संदीप गवळी, अन्सार शेख, अॅड. महेश शिंदे आदी उपस्थित होते.
डॉ. संतोष गिर्हे म्हणाले की, तंबाखू व धुम्रपान करणार्या युवकांची संख्या अधिक आहे. फॅशन म्हणून युवक-युवती व्यसन करताना दिसत आहे. नशेच्या आहारी जाऊन युवा वर्ग आपले जीवन उध्वस्त करीत आहे. व्यसन फक्त श्रीमंत वर्गा पुरता मर्यादित न राहता ग्रामीण भागातील तरुण देखील यामध्ये ओढले गेल आहे. व्यसनाधिनता चिंतेचा विषय असून, युवकांना व्यसनापासून वाचविण्यासाठी हे अभियान गावोगावी चालविण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
