• Wed. Mar 26th, 2025

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त भिंगार टेकडीवर स्वच्छता अभियान राबवून वृक्षरोपण

ByMirror

Jun 5, 2022

हरदिन मॉर्निंग ग्रुपचा उपक्रम


शरण निसर्गाला… ब्रिदवाक्याची घोषणा करुन वर्षभर पर्यावरण संवर्धनाचा संकल्प

अहमदनगर (प्रतिनिधी)- वर्षभर वृक्षरोपण व संवर्धनाचे उपक्रम राबविणार्‍या हरदिन मॉर्निंग ग्रुपच्या वतीने जागतिक पर्यावरण दिनानिमित्त भिंगार टेकडी येथील पौराणिक व ऐतिहासिक वारसा लाभलेल्या भृंगऋषींच्या मंदिर परिसरात स्वच्छता अभियान राबवून वृक्षरोपण करण्यात आले. तर भिंगार टेकडी हिरवाईने फुलविण्याचा संकल्प ग्रुपच्या सदस्यांनी व्यक्त केला. शरण निसर्गाला… या ब्रिदवाक्याची घोषणा करुन वर्षभर सण-उत्सव, जयंती, पुण्यतिथी, वाढदिवसला झाडे लावून त्यांचे संगोपन करण्याचा संकल्प करण्यात आला.


हरदिन मॉर्निंग ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष संजय सपकाळ यांच्या हस्ते रोप लाऊन वृक्षरोपण अभियानाची सुरुवात करण्यात आली. तर राजू कांबळे, पवन वाघमारे, संतोष वीर, अतुल वराडे यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त झाडे लाऊन त्यांच्या संवर्धनाची जबाबदारी स्विकारली. यावेळी रमेश वराडे, दीपक बडदे, मेजर दिलीप ठोकळ, दिलीप गुगळे, सुनील फळे, सुमेश केदारे, विनोद खोत, विकास भिंगारदिवे, सर्वेश सपकाळ, सुभाष गोंधळे, मनोहर दरवडे, नामदेव जावळे, अभिजीत सपकाळ, बापू तांबे, दीपक धाडगे, अशोक पराते, सुधाकर चिदंबर, दीपक घोडके, अशोक लोंढे, सदाशिव मांढरे, दिलीप बोंदर्डे, प्रसाद भिंगारदिवे, अब्बास शेख, अशोक दळवी, अजय खंडागळे, विकास निमसे, मारुती मोरे, एकनाथ जगताप, अविनाश जाधव, सरदारसिंग परदेशी, सूर्यकांत कटोरे, किरण फुलारी, राजू शेख, रामनाथ गर्जे, गोरख उबाळे, अविनाश काळे, सुनील नागपुरे, बापू निमसे, महेश सरोदे, जालिंदर अळकुटे, शिवम भंडारी, संदीप दळवी, सुदाम मोरे, सत्यभामा राहिंज, विठ्ठल राहिंज आदी सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.


संजय सपकाळ म्हणाले की, मनुष्याचे जीवन पर्यावरणाशी जोडलेले असून, पर्यावरण संवर्धनासाठी वृक्षरोपण काळाची गरज बनली आहे. ऑक्सीजन देण्याचे महत्त्वाचे कार्य वृक्ष करीत असतात, वृक्षांना जगविणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. वृक्षरोपणाने पर्यावरणाचा समतोल साधला जाणार आहे. तर आरोग्यासाठी सार्वजनिक स्वच्छता महत्त्वाची असून, सामाजिक उत्तरदायित्व म्हणून प्रत्येकाने एक झाड लाऊन सार्वजनिक परिसर स्वच्छ ठेवण्याचे त्यांनी सांगितले.


हरदिन मॉर्निंग ग्रुपच्या वतीने सण- उत्सव, विविध कार्यक्रम व ग्रुपच्या प्रत्येक सदस्याचा वाढदिवस वृक्षरोपणाने साजरा करण्याचा पायंडा पाडण्यात आला आहे. शहरातील ऐतिहासिक वास्तू, डोंगररांगा, उजाड माळरानावर वृक्षरोपण करुन त्याचे संवर्धन करण्यात आलेले आहे. ग्रुपच्या माध्यमातून वर्षभर आरोग्य चांगले राहण्यासाठी योग, प्राणायाम तर पर्यावरण संवर्धनासाठी वृक्षरोपण व त्याचे संवर्धन केले जात आहे. ही मोहिम वर्षभर सुरु असून, याला चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे ग्रुपच्या वतीने स्पष्ट करण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *