जिल्हा संघटकपदी विजय जाधव
पिडीतांना हक्काची जाणीव करुन देऊन, त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी कटिबध्द -प्रा. पंकज लोखंडे
अहमदनगर (प्रतिनिधी)- अन्याय निवारण कृती समितीच्या अहमदनगर जिल्हा व राहुरी तालुक्यासाठी पदाधिकार्यांची नियुक्ती करण्यात आली. समितीचे राज्य अध्यक्ष मोहन ठोंबे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकित राज्य सचिव प्रा. पंकज लोखंडे यांनी पदाधिकार्यांच्या नियुक्तींची घोषणा केली. यावेळी जितेद्र ठोंबे, नितिन साठे, विष्णू पाटोळे, शरद सरोदे, शलमोन भालेराव, रमेश गायकवाड, रमेश आल्हाट, युसूफ शेख, जावेद सय्यद, अमोल हरीक्षचंद्रे, सोन्याबापू भाकरे आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
राज्य अध्यक्ष मोहन ठोंबे म्हणाले की, वंचित घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी युवकांनी पुढाकार घेण्याची गरज आहे. समाजात मोठ्या संख्येने युवकांचे प्रश्न प्रलंबीत असून, ते प्रश्न युवकांच्या संघर्षातून सुटणार असल्याचे त्यांनी सांगितले. राज्य सचिव प्रा. पंकज लोखंडे यांनी अन्याय निवारण कृती समितीच्या वतीने वंचित घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी व मागासवर्गीय, अल्पसंख्यांक समाजावर अन्याय, अत्याचाराचा बिमोड करण्यासाठी कार्य सुरु आहे. पिडीतांना त्यांचे हक्काची जाणीव करुन देऊन, त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी संघटना कटिबध्द असून, युवकांना सामाजिक कार्यासाठी प्रोत्साहन दिले जात असल्याचे त्यांनी सांगितले.
या बैठकित विजय जाधव यांची जिल्हा संघटकपदी तर उदय खळेकर राहुरी तालुकाध्यक्षपदी आणि विजय दुबे यांची राहुरी तालुका सचिवपदी नियुक्ती करण्यात आली. या नुतन पदाधिकार्यांचा समितीच्या वतीने सत्कार करुन त्यांना पुढील सामाजिक कार्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या.