सचिवपदी संदीपसिंग चव्हाण, खजिनदारपदी डॉ. संदीप सांगळे तर सहसचिवपदी नरेंद्र मुळे व माधवी मांढरे यांची नियुक्ती
वाजिद शेख अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरासह जिल्ह्यात सामाजिक, वैद्यकीय, शैक्षणिक, पर्यावरण व सांस्कृतिक कार्यात सक्रीय असलेल्या लायन्स क्लब ऑफ अहमदनगर मिडटाऊनच्या नुकतीच नवीन कार्यकारणी जाहीर करण्यात आली. मागील 32 वर्षापासून विविध क्षेत्रात लायन्स मिडटाऊनचे कार्य सुरु असून, 2024-25 या वर्षासाठी अध्यक्षपदी प्रसाद मांढरे, सचिवपदी संदीपसिंग चव्हाण, खजिनदारपदी डॉ. संदीप सांगळे, सहसचिवपदी माधवी मांढरे व सहखजिनदारपदी नरेंद्र मुळे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.
क्लबच्या ज्येष्ठ सदस्यांच्या उपस्थितीमध्ये झालेल्या बैठकीत सर्वानुमते नवनी कार्यकारिणी जाहीर करण्यात आली असून, मागील पदाधिकाऱ्यांना सलग दुसऱ्यांदा संधी मिळाली आहे. लायन्स मिडटाऊन 1993-94 सालापासून आंतरराष्ट्रीय लायन्स संघटनेच्या प्रांत 3234 डी 2 च्या प्रांतीय कार्यक्रमात प्रत्येक वर्षी वेगवेगळे सामाजिक उपक्रम राबवित आहे. या क्लबची स्थापना स्व. श्रीकांत मांढरे यांनी समाजातील वंचित घटकांना आधार देण्यासाठी केली होती. प्रांतात एक आघाडीवर असलेला व शहरातील सर्वात जुना हा क्लब असून, विविध क्षेत्रातील व्यक्ती या क्लबशी जोडले गेलेले आहे.
लायन्स मिडटाऊनला सामाजिक कार्याबद्दल प्रांतीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर अनेक पुरस्कार मिळले आहेत. क्लबने जिल्ह्यात अनेक कायमस्वरूपी प्रकल्प राबवून गरजूंना आधार दिला आहे. वडिल स्व. श्रीकांत मांढरे यांनी ज्या उद्देशाने या क्लबची स्थापना केली, तो उद्देश व त्यांच्या विचारांची प्रेरणा घेऊन सामाजिक भावनेने व गरजूंना आधार देण्यासाठी विविध प्रकल्प राबविण्यात येणार असल्याची माहिती नुतन अध्यक्ष प्रसाद मांढरे यांनी दिली.
नवनिर्वाचित अध्यक्ष प्रसाद मांढरे हे कालिका ॲडव्हर्टायझिंग ॲण्ड मार्केटिंगचे संचालक असून, राजलक्ष्मी हॉलिडेज वीणा वर्ल्डचे जिल्हा प्रेफर्ड सेल्स पार्टनर आहे. तर जाहिरात संघटनेचे सचिव व अहमदनगर टुरिझम फोरमचे संचालक आहेत. सचिव संदीपसिंग चव्हाण हे कर सल्लागार व अधिकृत शस्त्र परवाना विक्रेते आहे. सामाजिक क्षेत्रात त्यांचे कार्य सुरु आहे. खजिनदार डॉ. संदीप सांगळे हे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे मराठी अभ्यास मंडळाचे सदस्य म्हणून कार्यरत आहेत. विविध वृत्तपत्रात त्यांनी पत्रकार म्हणून काम केले असून, ते पुणे विद्यापीठाच्या पीएचडीचे मार्गदर्शक आहे. तर ज्ञानप्रबोधिनी ग्रामविकास प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष म्हणून काम पाहत आहेत. सहसचिव माधवी मांढरे व सहखजिनदार नरेंद्र मुळे सामाजिक कार्यात सक्रीय असून, सामाजिक कार्यासाठी ते अनेक वर्षापासून क्लबला जोडले गेलेले आहेत. या नूतन पदाधिकारी व कार्यकारणीचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.