भविष्य घडविण्यासाठी विद्यार्थ्यांच्या कलागुणांना प्रोत्साहन द्यायला हवे -अविनाश कुलकर्णी
नगर (प्रतिनिधी)- प्रत्येक पालकांनी आपल्या मुलांमधील सुप्तगुण शोधावे. त्या गुणांना वाव दिल्यास तो नक्कीच आयुष्यात यशस्वी होऊ शकतो. त्यांचे भविष्य घडविण्यासाठी कलागुणांना प्रोत्साहन द्यायला हवे. सध्या शिक्षण पध्दती मोठ्या प्रमाणात बदलत असून, तंत्रज्ञानाचा वापर अधिक वाढला आहे. स्पर्धामय युगात वावरताना मुलांच्या कला-कौशल्यांना तितकेच महत्त्व देण्याचे आवाहन अविनाश कुलकर्णी यांनी केले.
संस्कृती श्रीनिवास कनोरे प्रशालेच्या वार्षिक स्नेहसंमेलन आणि पारितोषिक वितरण समारंभाच्या अध्यक्षीय भाषणात कुलकर्णी बोलत होते. कार्यमाचे उद्घघाटन उद्योजक राजेंद्र शुक्रे यांच्या हस्ते झाले. यावेळी अरविंद धिरडे, गजेंद्र सोनवणे, संजय सावगांवकर, जितेंद्र लांडगे, विक्रम पाठक, सचिन मडके, चंद्रकांत मानकर, मुख्याध्यापिका कल्पना भामरे, बबनभाई शेख, अनिता जपकर, युवराज शेख, राधिका गवते आदींसह शालेय शिक्षक, शिक्षिका, पालक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पुढे कुलकर्णी म्हणाले की, विद्यार्थ्यांनी आवड असलेल्या खेळ, कला, गायन अशा कोणत्याही क्षेत्राचे छंद जोपासावे. विद्यार्थ्यांना त्या कलेत नैपुण्य मिळवून देण्यासाठी पालक व शिक्षकांनी प्रयत्न करावे. शाळेत शिक्षक विद्यार्थ्यांकडे लक्ष देतातच. त्याजोडीला पालकांनीही लक्ष दिले पाहिजे. अशा प्रयत्नातूनच विद्यार्थी खऱ्या अर्थाने घडणार असल्याचे त्यांनी सांगितले.
राजेंद्र शुक्रे म्हणाले की, शिक्षकांनी शिक्षणाबरोबरच गुणवत्ता वाढीवर भर दिला पाहिजे. कनोरे शाळेत शिक्षक परिश्रमपूर्वक विद्यार्थी घडवत आहेत. भविष्यात या शाळेची सुसज्ज इमारत होईल तसेच अनेक चांगले विद्यार्थी निश्चितच घडणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
मुख्याध्यापिका कल्पना भामरे यांनी अहवाल वाचन करताना शाळेतील गुणवत्ता वाढीच्या उपक्रमांची माहिती दिली. विद्यार्थ्यांचे कौतुक केले. यावेळी उपस्थित मान्यवरांनीही मनोगत व्यक्त करुन विद्यार्थ्यांच्या कलागुणांचे कौतुक केले. यावेळी विद्यार्थ्यांनी उत्कृष्टपणे सांस्कृतिक कार्यक्रम सादर करून उपस्थितांची मने जिंकली. कार्यक्रमासाठी शिक्षक जगन्नाथ कांबळे, सुशीलकुमार आंधळे, चंदा कार्ले, विद्या नरसाळे, संयुक्त खरात, वैशाली केदारे, रितीका राऊळ, कर्मचारी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यमचे सूत्रसंचालन राजेंद्र गर्जे यांनी केले.