स्नेहबंध सोशल फाऊंडेशनने सन्मानपत्र देवून केला सत्कार
नगर (प्रतिनिधी)- अहिल्यानगर पोलीस दलातर्फे 35 व्या नाशिक परिक्षेत्रीय पोलीस क्रीडा स्पर्धा उत्साहात पार पडल्या. यामध्ये उत्कृष्ट मार्च पास संचलन केल्याबद्दल पोलीस मुख्यालयाचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक अन्वर अली सय्यद यांचा स्नेहबंध सोशल फाऊंडेशनच्या वतीने सन्मानपत्र देवून गौरव करण्यात आला.
पोलीस उपनिरीक्षक सय्यद यांचा जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला व स्नेहबंधचे संस्थापक अध्यक्ष डॉ. उद्धव शिंदे यांनी त्यांचा सत्कार केला. जिल्हा पोलीस अधीक्षक ओला यांनी देखील सय्यद यांनी केलेल्या उत्कृष्ट मार्च पास संचलनाचे कौतुक केले.

डॉ. उध्दव शिंदे म्हणाले की, पोलीस दलात अनेक कलागुण असलेले अधिकारी व कर्मचारी आहेत. कला, क्रीडा क्षेत्रात आपले नावलौकिक मिळवत असताना पोलीस दलातही उत्कृष्टपणे कार्य करत आहे. सय्यद यांनी केलेल्या उत्कृष्ट संचलनाचा सन्मान होण्यासाठी त्यांना संस्थेच्या वतीने गौरवपत्र प्रदान करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.