• Sat. Feb 8th, 2025

निमगाव वाघात युवकांचे रक्तदान, तर नागरिकांची आरोग्य तपासणी

ByMirror

Jan 15, 2025

राष्ट्रीय युवा सप्ताहाचा उपक्रम

विमलकाव्य संग्रहाचे प्रकाशन; काव्य संमेलनात रंगला महिलांचा हळदी-कुंकू कार्यक्रम

नगर (प्रतिनिधी)- निमगाव वाघा (ता. नगर) येथे स्वामी विवेकानंद व राजमाता जिजाऊ यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय युवा सप्ताहाच्या पार्श्‍वभूमीवर ग्रामस्थांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली. तर रक्तदान शिबिरात युवकांचा उत्सफूर्त प्रतिसाद लाभला. नेहरु युवा केंद्र, जिल्हा क्रीडा कार्यालय, श्री नवनाथ युवा मंडळ व स्व.पै. किसनराव डोंगरे बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने विशेष घटक योजनेतंर्गत हा उपक्रम घेण्यात आला.


या शिबिराप्रसंगी ज्येष्ठ साहित्यिक ज्ञानदेव पांडुळे, ज्ञानदेव लंके, काव्य संमेलनाच्या अध्यक्षा अनिता काळे, कार्याध्यक्षा कवयित्री सरोज आल्हाट, संमेलनाचे संयोजक तथा ग्रामपंचयात सदस्य पै. नाना डोंगरे, गझलकार रज्जाक शेख, कवी गीताराम नरवडे, आनंदराव साळवे, कल्पना दबडे, युवा मंडळाचे अध्यक्ष संदिप डोंगरे, भरत कांडेकर, भागचंद जाधव, रंगनाथ सुंबे, अशोक भालके, प्रसाद काळे, राजू जाधव, अमोल बास्कर, अनंत कराड आदी उपस्थित होते.


पार पडलेल्या सातव्या राज्यस्तरीय काव्य संमेलनात विमलकाव्य संग्रहाचे प्रकाशन करण्यात आले. कवी संजय महाजन यांनी प्रेम, निसर्ग, सामाजिक घटनांचे प्रतिबिंब तसेच घरगुती जीवनातील साध्या क्षणांचे चित्रण काव्यातून केले आहे. या कवितांमधून ग्रामीण भागातील संघर्ष आणि भक्तीमय भावनांचा सुंदर मिलाफ दर्शविण्यात आला आहे. तसेच काव्य संमेलनात मकर संक्रांतनिमित्त हळदी-कुंकूचा कार्यक्रम पार पडला. महिलांनी एकमेकींना हळद-कुंकू लावून वाचन संस्कृती रुजविण्यासाठी वाण म्हणून पुस्तके दिली. तर काव्य स्वरुपात महिलांनी उखाणे घेतले. यावेळी अर्चना देवकर, मंदाताई डोंगरे, जयश्री मतकर, हेमलता गिते, जयमाला महाजन, लता कराळे, सौ. केदारी, सुषमा वैद्य आदी उपस्थित होत्या.


रक्ताचा तुटवडा भरुन काढण्यासाठी व ग्रामीण भागातील नागरिकांना आरोग्य सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी रक्तदान व आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. डॉ. भाग्यश्री पवार यांनी निरोगी आरोग्यासाठी ग्रामस्थांनी मार्गदर्शन केले. रक्तदान शिबिरासाठी न्यू अर्पण ब्लड बँकेचे सहकार्य लाभले. रक्तदात्यांचा यावेळी प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह देवून सत्कार करण्यात आला. या उपक्रमास जिल्हा क्रीडा अधिकारी आमसिध्द सोलनकर, नेहरु युवा केंद्राचे जिल्हा युवा अधिकारी संकल्प शुक्ला यांचे मार्गदर्शन लाभले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *