शाहू महाराजांचे विचार भावी पिढीत रुजविण्यासाठीचा उपक्रम
वाजिद शेख अहमदनगर (प्रतिनिधी)- राजर्षी शाहू महाराज जयंती निमित्त शाहू महाराजांच्या चरित्रावर अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेतील शाखा शाळा व महाविद्यालयाच्या ग्रंथालयास पुस्तकांची भेट देण्यात आली. न्यू आर्ट्स कॉमर्स ॲण्ड सायन्स महाविद्यालयाचे प्रशासकीय कर्मचारी तथा सामाजिक कार्यकर्ते संतोष कानडे यांनी शाहू महाराजांचे विचार भावी पिढीत रुजविण्यासाठी जयंती दिनाचा हा आगळा-वेगळा उपक्रम राबविला.
अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेतील सर्व शाळा व महाविद्यालयाच्या ग्रंथालयास शाहू महाराजांच्या चरित्रावर प्रा. नानासाहेब साळुंखे लिखित शाहूंच्या आठवणी या पुस्तकांच्या 30 प्रती विविध शाखा शाळांच्या विद्यार्थ्यांना वाचनासाठी उपलब्ध व्हाव्यात याकरिता संस्थेचे अध्यक्ष रामचंद्र दरे यांच्याकडे सुपुर्द करण्यात आल्या. यावेळी माजी कुलगुरू डॉ. सुधीर गव्हाणे, संस्थेचे उपाध्यक्ष डॉ. विवेक भापकर, सचिव ॲड. विश्वासराव आठरे पाटील, सहसचिव जयंत वाघ, खजिनदार दीपलक्ष्मी म्हसे, विश्वस्त मुकेश मुळे, दीपक दरे, अर्जुनराव पोकळे, अरुणाताई काळे, कल्पना वायकर, प्राचार्य डॉ. बाळासाहेब सागडे आदी उपस्थित होते.
संस्थेचे अध्यक्ष रामचंद्र दरे म्हणाले की, शाहू महाराज लोककल्याणकारी राजे होते. बहुजनांना शिक्षण जातीभेद निर्मूलन, नोकऱ्यांमध्ये आरक्षण आणि स्त्रीमुक्ती कायदे करणारे सुधारणावादी समाजसुधारक होते. शिक्षणाद्वारे जातीभेद निर्मूलन होण्यासाठी त्यांनी कार्य केले. मनुष्याला सुसंस्कृत बनविण्याकरिता पुस्तके भावी पिढीत विचार रुजवतात, बहुजन समाजाला दिशा देणारे शाहू महाराजांचे विचार व कार्य नवीन पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी संस्थेचे कर्मचारी संतोष कानडे यांनी राबविलेला हा उपक्रम आदर्शवत असल्याचे त्यांनी सांगितले.
शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांपर्यन्त शाहू महाराजांचे कार्य साहित्याच्या माध्यमातून पोहोचण्यासाठी या पुस्तकाची मदत होणार असल्याचेही मत दरे यांनी व्यक्त केले. ज्ञानाचा मुख्य स्त्रोत म्हणून पुस्तकाचे महत्त्व आजही टिकून आहे. विद्यार्थ्यांना सुसंस्कृत बनवण्यासाठी वाचनाकडे वळवण्याची गरज असून, त्या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आल्याचे संतोष कानडे यांनी सांगितले.