• Mon. Jun 29th, 2026

Mirrornews24

Marathi News

बुरुडगावला रंगला अश्‍वरिंगण सोहळा

ByMirror

Jun 20, 2023

बुरूडगाव पायी दिंडीचे श्री क्षेत्र पंढरपूरकडे प्रस्थान

वारकर्‍यांचा उतरवला विमा

अहमदनगर (प्रतिनिधी)- बुरुडगाव (ता. नगर) येथून मंगळवारी (दि.20 जून) सकाळी श्री क्षेत्र बुरूडगावची पायी दिंडी श्री क्षेत्र पंढरपूरला आषाढी वारीसाठी पर्यावरण संवर्धन व स्वच्छतेचा संदेश देत मार्गस्थ झाली. गावात सकाळी ज्ञानोबा-तुकोबांच्या जयघोषात व टाळ मृदंगाच्या गजराच्या भक्तीमय वातावरणात डोळे दिपवून टाकणारा अश्‍वरिंगण सोहळा पार पडला. वैष्णवांच्या मेळ्यातून माऊली… माऊली… च्या गजरात पालखी भोवती धावलेल्या अश्‍वाने डोळ्यांचे पारणे फेडले.


प्रारंभी जिल्हाधिकारी सिध्दाराम सालीमठ यांच्या हस्ते दिंडीतील पालखीचे पूजन करुन आरती करण्यात आली. यावेळी विभाग नियंत्रक राज्य परिवहन महामंडळाच्या मनीषा सपकाळ, उपविभागीय अधिकारी सुधीर पाटील, प्रसिद्ध उद्योजक नरेंद्र फिरोदिया आदी उपस्थित होते.


जिल्हाधिकारी सिध्दाराम सालीमठ म्हणाले की, बुरूडगाव पायी दिंडी तर्फे उतरवण्यात आलेला वारकर्‍यांचा विमा हा अभिनव उपक्रम इतर दिंडी सोहळ्यासाठी प्रेरणा देणारा आहे. पाऊसाने ओढ दिल्याने उन्हाची तीव्रता भासत आहे. वारकर्‍यांना उन्हाचा परिणाम होऊ नये, यासाठी उन्हात जास्त न चालता आरोग्य सांभाळून वारीचा आनंद घ्यावा. वारी भक्तीमय होण्यासाठी जिल्हाधिकार्‍यानी शुभेच्छा दिल्या.


पारंपारिक वाद्यांच्या गजरात गावात दिंडीची प्रदक्षिणा मारण्यात आली. दिंडीच्या स्वागतासाठी महिलांनी घरासमोर सडा-रांगोळी टाकली होती. दिंडीच्या अग्रभागी शालेय विद्यार्थी भगवे ध्वज व लेझिम घेऊन सहभागी झाले होते. वारकरी संप्रदायाची पताका खांद्यावर घेऊन ज्ञानोबा माऊली तुकारामचा जयघोष करणारे झेंडेकरी, टाळकरी, भजनी मंडळी, फुलांनी सजवलेले रथ व डोक्यावर तुळशी, कळस घेतलेल्या महिला दिंडीत सहभागी झाल्या आहेत. दिंडीतील रथाचे दर्शन घेण्यासाठी भाविकांनी गर्दी केली होती.


दिंडीचे हे सहावे वर्ष असून, यावर्षीच्या दिंडीत तीनशे ते चारशे गावातील वारकरी मोठ्या भक्तीभावाने वारीत सहभागी झाले आहेत. ह.भ.प. लक्ष्मण महाराज शास्त्री, ह.भ.प. योगेश महाराज यांच्या आशीर्वादाने व ह.भ.प. दीपक महाराज भवर यांच्या मार्गदर्शनाखाली दिंडी पंढरपूरकडे मार्गस्थ झाली. या दिंडीचे प्रमुख नियोजन प्रा. डॉ. संतोष यादव, जालिंदर तात्या कुलट, किशोर कुलट, शिवाजी मोढवे, बापूसाहेब औताडे, संदीप तांबे, फारूक पठाण, नंदू टीमकरे, अक्षय लगड, अमित जाधव, ज्ञानेश्‍वर गायकवाड यांनी केले.

समस्त ग्रामस्थांनी दिंडी सोहळ्यास स्वइच्छेने वर्गणी व उपयोगी साहित्य देऊन दिंडीला शुभेच्छा दिल्या.
दिंडीतील वारकर्‍यांना भाग्यलक्ष्मी मल्टीस्टेट यांच्या वतीने छत्र्या देण्यात आल्या. उद्योजक नरेंद्र फिरोदिया यांच्या तर्फे रेनकोटचे वाटप करण्यात आले. तसेच दिंडीतील सहभागी वारकर्‍यांचा विमा दिंडी समिती तर्फे उतरविण्यात आला असून, त्या प्रमाणपत्राचे, छत्रीचे व रेनकोटचे वितरण जिल्हाधिकारी सालीमठ यांच्या हस्ते करण्यात आले. दिंडीतील सर्व वारकर्‍यांना शबनम पिशवी अमोल तातेड यांच्या वतीने देण्यात आल्या.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *