• Tue. Jul 14th, 2026

Mirrornews24

Marathi News

बाराबाभळीच्या जिल्हास्तरीय इज्तेमाला सुरुवात

ByMirror

Dec 16, 2022

पहिल्याच दिवशी एक लाख मुस्लिम भाविकांची हजेरी

अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरालगत बाराबाभळी (ता. नगर) येथील जामिया मोहम्मदिया मदरसाच्या मैदानावर आयोजित जिल्हास्तरीय इज्तेमाला शुक्रवारी (दि.16 डिसेंबर) पहाटेपासून सुरुवात झाली. तब्बल एक लाख मुस्लिम भाविक या इज्तेमामध्ये सहभागी झाले आहेत. दुपारी जुम्माची (विशेष) नमाज अदा करण्यात आली.


अतिशय शिस्तबध्द पध्दतीने इज्तेमा होत असून, मोठ्या संख्येने युवा स्वयंसेवक खिदमत (सेवा) करीत आहेत. इज्तेमाच्या पहिल्या दिवशी पुणे येथील मौलाना मुबीन यांच्या मार्गदर्शनाखाली नमाज पठण झाली. मौलाना मुबीन यांच्या प्रवचनाने उपस्थित भाविक मंत्रमुग्ध झाले.

मौलाना मुबीन यांनी आपल्या बयानमध्ये भाईचारा, ईस्लाम धर्माची शिकवण व मोहम्मद पैगंबर यांनी दिलेल्या माणुसकी व समतेच्या संदेशाची माहिती दिली. त्यांनी सत्याच्या मार्गावर चालावे, कोणालाही दुखवू नये. अहंकार, घमंड, श्रीमंत-गरीब यातील भेद दूर करुन कुरानमध्ये दिले गेलेल्या संदेशाप्रमाणे जीवन आचरण करण्याचे सांगितले. या इज्तेमासाठी लहान मुलांपासून युवक व ज्येष्ठ नागरिक देखील मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत.


या इज्तेमासाठी मदरसेच्या 65 एकर मैदानावर तब्बल दोन लाख भाविकांची व्यवस्था करण्यात आलेली आहे. कोरोनाच्या दोन वर्षानंतर एवढ्या मोठ्या प्रमाणात जिल्ह्यात इज्तेमा होत आहे. एक महिन्यापासून या इज्तेमाची तयारी सुरु होती. या धार्मिक कार्यक्रमात 20 एकर मध्ये मुख्य मंडप उभारण्यात आला असून, यामध्ये नमाज पठण व प्रवचन सुरु आहे. प्रशस्त पार्किंग व भाविकांसाठी विविध खाद्य पदार्थांचे स्टॉल देखील लावण्यात आलेले आहेत. स्वच्छतेची विशेष काळजी घेण्यात आली असून, स्वच्छतागृह व स्वयंसेवक स्वच्छतेबाबत विशेष काळजी घेत आहे.

शनिवारी सामुदायिक दुवाने होणार इज्तेमाची सांगता
शनिवारी विशेष म्हणजे हजरत मौलाना साद यांचे चिरंजीव मौलाना युसूफ उपस्थित राहणार आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली नमाज, बयान व दुवा होणार आहे. समारोपीय कार्यक्रमाला दोन लाखापेक्षा जास्त भाविक येण्याची शक्यता आयोजकांनी वर्तवली आहे.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *