• Tue. Jul 14th, 2026

Mirrornews24

Marathi News

बाराबाभळीच्या इज्तेमात लोटला भाविकांचा जनसागर

ByMirror

Dec 17, 2022

शेवटच्या दिवशी दोन लाखापेक्षा अधिक भाविकांची हजेरी

विश्‍वशांती, भाईचारा व सर्व मानव जातीच्या कल्याणासाठी दुवाने इज्तेमाची सांगता

अहमदनगर (प्रतिनिधी)- बाराबाभळी (ता. नगर) येथील जिल्हास्तरीय इज्तेमात शनिवारी (दि.17 डिसेंबर) मुस्लिम भाविकांचा जनसागर लोटला होता. जिल्ह्यातील दोन लाखापेक्षा अधिक मुस्लिम भाविकांनी या इज्तेमाला हजेरी लावली. संध्याकाळी उशीरा सामुदायिक दुवाने इज्तेमाची सांगता झाली.


अपेक्षेपेक्षा अधिक भाविकांची अलोट गर्दी लोटल्याने संध्याकाळी उशिरा येणार्‍या भाविकांना पाय ठेवण्यासाठी देखील मैदानात जागा नव्हती. परिसर वाहनांच्या पार्किंगने गच्च भरले होते. लाखोंच्या जनसमुदायाचे शिस्तबद्ध दर्शन या धार्मिक कार्यक्रमातून दिसून आले. शुक्रवार पहाटेपासूनच या धार्मिक कार्यक्रमासाठी भाविकांचे जथे येत होते. येणार्‍या भाविकांसाठी चौका-चौकात पाणी, सरबत व अल्पोपहाराचे वाटप सुरु होते. या कार्यक्रमासाठी खिदमत करणार्‍या युवकांनी काटेकोर नियोजन केले. वजूसाठी ठिकठिकाणी पाण्याचे टँकर, शेत तळे व विहीरच्या पाण्याचे नियोजन करण्यात आले होते.
शनिवारी सकाळी मदरसेतील 31 कुरान हाफिज झालेल्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव करण्यात आला. इज्तेमासाठी हजरत मौलाना साद यांचे दोन्ही मुले मौलाना युसूफ व मौलाना सईद प्रमुख म्हणून उपस्थित होते. सकाळी मौलाना सईद यांचे धार्मिक प्रवचन झाले. संध्याकाळी 18 युवकांचे सामुदायिक विवाह लावून, साध्या पध्दतीने विवाह करण्याचा समाजाला संदेश देण्यात आला. तर मगरीबच्या (संध्याकाळ) नमाजनंतर मौलाना युसूफ यांचे प्रवचन झाले. या प्रवचनात त्यांनी भाईचारा, ईस्लाम धर्माची शिकवण व माणुसकीचा संदेश दिला.


रात्री अलोटगर्दीत विश्‍वशांती, भाईचारा व सर्व मानव जातीच्या कल्याणासाठी दुवा करण्यात आली. आमीन… आमीन म्हणत मुस्लिम भाविकांनी अल्लाह चरणी मनोभावे दुवा केली. या इज्तेमाला विविध पक्षाच्या राजकीय पुढार्‍यांनी भेट देऊन मुस्लिम बांधवांना शुभेच्छा दिल्या.
इज्तेमाच्या नियोजनासाठी सहकार्य करणारे पोलीस प्रशासन, जिल्हा प्रशासन, महावितरण, गाव परिसरातील ग्रामस्थ, युवा स्वयंसेवकांचे मुस्लिम समाजाच्या वतीने आभार मानण्यात आले आहे.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *