कॉम. कारभारी उगले अध्यक्ष; सुरेश पानसरे, सतीश पवार व उषा अडांगळे उपाध्यक्ष
आयटकच्या जिल्हा अधिवेशनात कामगारांच्या हक्कांसाठी लढ्याचा निर्धार; किमान वेतन, पेन्शन, सेवाशर्तींसह विविध मागण्यांसाठी एल्गार
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- अहमदनगर जिल्हा आयटकचे त्रैवार्षिक अधिवेशन अहिल्यानगर शहरातील भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या कार्यालयात उत्साहात पार पडले. कॉम. कारभारी उगले यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या अधिवेशनात जिल्हा सेक्रेटरी म्हणून ॲड. कॉम. सुधीर टोकेकर यांची एकमताने निवड करण्यात आली. अध्यक्षपदी कॉम. कारभारी उगले यांची निवड झाली. तर उपाध्यक्षपदी कॉम. सुरेश पानसरे, कॉम. सतीश पवार आणि कॉम. उषा अडांगळे यांची निवड करण्यात आली.
ऑक्टोबर 2019 मध्ये जिल्हा अधिवेशन झाल्यानंतर विविध कारणांमुळे पुढील अधिवेशनास विलंब झाला. सुमारे पाच ते सहा वर्षांनंतर झालेल्या या अधिवेशनात मागील कालावधीतील संघटनेच्या कामाचा आढावा घेण्यात आला. जिल्हा सेक्रेटरी ॲड. कॉम. सुधीर टोकेकर यांनी मागील तीन वर्षांच्या कामाचा अहवाल अधिवेशनासमोर मांडला.
अहमदनगर जिल्ह्यात आयटकशी संलग्न असलेल्या विविध कामगार संघटनांच्या माध्यमातून कामगारांच्या प्रश्नांवर सातत्याने लढा सुरू असल्याचे यावेळी सांगण्यात आले. ग्रामपंचायत कर्मचारी संघटना, पतसंस्था कर्मचारी संघटना, आशा व गटप्रवर्तक संघटना, अवतार मेहेर बाबा ट्रस्ट युनियन, मोहट देवी कामगार युनियन, मढी देवस्थान, लालगीर बाबा ट्रस्ट मंडळी, तलरेजा फर्म, पारनेर नगर पंचायत, मोलकरीण संघटना आदी विविध युनियन आयटकशी संलग्न आहेत. या संघटनांच्या माध्यमातून कामगारांना किमान वेतन, भविष्य निर्वाह निधी (पीएफ), सेवाशर्ती लागू करून घेण्यासाठी प्रयत्न करण्यात आले असून, कामगारांच्या विविध प्रश्नांवर कामगार न्यायालयातही प्रकरणे दाखल करण्यात आल्याचे अधिवेशनात सांगण्यात आले.
अवतार मेहेर बाबा ट्रस्टमध्ये आयटकची लालबावटा युनिट कार्यरत आहे. या युनिटचे अध्यक्ष कॉम्रेड सतीश पवार यांच्या नेतृत्वाखाली तसेच संघटनेचे ॲड. कॉम. टोकेकर आणि कॉम. सुभाष लांडे यांच्या माध्यमातून कामगारांसाठी तीन वर्षांचा करार करण्यात आला. या करारामुळे कामगारांना 4 हजार 800 रुपयांची वेतनवाढ मिळवून देण्यात आल्याची माहिती अधिवेशनात देण्यात आली.
ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या किमान वेतन आणि पेन्शन योजनेसाठी आयटकचा लढा सुरू असून, सध्या 14 ते 15 हजार रुपये वेतन मिळणाऱ्या कर्मचाऱ्यांना 28 हजार रुपये वेतन मिळाले पाहिजे, अशी मागणी करण्यात आली. त्याचप्रमाणे आशा वर्कर आणि गटप्रवर्तक यांनाही 28 ते 30 हजार रुपये वेतन मिळावे, पेन्शन योजनेची अंमलबजावणी करावी आणि पेन्शनसाठी पूर्वीची 65 वर्षांची वयोमर्यादा कायम ठेवावी, अशी मागणी करण्यात आली.
मढी देवस्थान तसेच लालगीर बुवा ट्रस्टमधील कर्मचाऱ्यांना सेवाशर्ती लागू करून किमान वेतन मिळावे, यासाठीही संघटनेचा लढा सुरू असल्याचे सांगण्यात आले. जिल्ह्यात आयटक कामगार संघटनेचे सध्या सुमारे सात ते आठ हजार सभासद असल्याची माहिती देण्यात आली. कामगारांच्या विविध प्रश्नांसाठी संघटनेच्या माध्यमातून सातत्याने संघर्ष सुरू ठेवण्याचा निर्धार अधिवेशनात व्यक्त करण्यात आला.
अध्यक्ष कॉम. कारभारी उगले यांनी आपल्या भाषणात कामगारांनी संघटित होऊन अधिकाधिक लढे उभारण्याची गरज व्यक्त केली. कामगारांच्या सेवाशर्ती, वेतन आणि इतर न्याय्य मागण्या मान्य करून घेण्यासाठी संघटित शक्तीच्या माध्यमातून संघर्ष करावा, असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी ॲड. कॉम. सुधीर टोकेकर यांनी सांगितले की, देशातील आयटक ही कामगार क्षेत्रातील मोठी संघटना असून देशभरात तिचे सुमारे एक कोटी सभासद आहे. 3 व 4 ऑक्टोबर 2026 रोजी नागपूर येथे राज्य अधिवेशन होणार असून, त्यानंतर बंगळुरू येथे राष्ट्रीय अधिवेशन होणार आहे. या अधिवेशनांमध्ये कामगारांच्या विविध प्रश्नांवर आणि संघटनात्मक विषयांवर चर्चा होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
अधिवेशनात जिल्हा कार्यकारिणीच्या विविध पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली. जिल्हा सेक्रेटरी म्हणून ॲड. कॉम. सुधीर टोकेकर, अध्यक्ष म्हणून कॉम. कारभारी उगले, तर उपाध्यक्ष म्हणून कॉम. सुरेश पानसरे, कॉम. सतीश पवार आणि कॉम. उषा अडांगळे यांची निवड झाली. सहसेक्रेटरी म्हणून आशा गटप्रवर्तक संघटना, शेवगाव तालुक्यातील प्रमुख कॉ. संदीप इथापे यांची निवड करण्यात आली. तसेच लंका पठाडे यांचीही सहसेक्रेटरी म्हणून निवड करण्यात आली. खजिनदार म्हणून वर्षा चव्हाण यांची निवड करण्यात आली. कार्यकारिणी सदस्य म्हणून कॉम. मारुती सावंत, कॉम. निवृत्ती दातीर, विडी युनियनच्या सुमित्रा जिंदम, आशा देशमुख, जयश्री गुरव, आशा मगर, सुवर्णा देशमुख, विजय सोनवणे, सौ. गोयर, कॉम. मारुती दहिफळे, विद्या मुंढेकर आणि सौ. घोरपडे (राहुरी) यांची निवड करण्यात आली. सल्लागार म्हणून कॉम. प्रताप सहाणे आणि कॉम. ॲड. सुभाष लांडे (राज्य सचिव, भाकप) यांची निवड झाली.
तंबाखू कामगार युनियनमधील कार्याबद्दल कॉम. प्रताप सहाणे यांना समाज भूषण पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचा अधिवेशनात सत्कार करण्यात आला. तसेच बिडी युनियनमधील योगदानाबद्दल कॉम. निवृत्ती दातीर यांचाही सत्कार करण्यात आला. उपाध्यक्ष म्हणून निवड झाल्याबद्दल कॉम. उषा अडांगळे, कॉम. सतीश पवार आणि आशा व गटप्रवर्तक संघटनेचे कार्याध्यक्ष कॉम. सुरेश पानसरे यांचा त्यांच्या कामातील योगदानाबद्दल सत्कार करण्यात आला. यावेळी कॉम. उषा अडांगळे आणि लंका पठाडे यांनी मनोगत व्यक्त केले. अधिवेशनाची निवड समिती म्हणून कॉम्रेड सुधीर टोकेकर, कॉम्रेड कारभारी उगले आणि श्रीमती लंका पठाडे यांनी कामकाज पाहिले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कॉम. सुरेश पानसरे यांनी केले, तर आभार कॉम. संदीप इथापे यांनी मानले.

