• Thu. Apr 24th, 2025

विजय भालसिंग यांचा राष्ट्रीय निसर्ग पर्यावरण पुरस्काराने गौरव

ByMirror

Sep 30, 2024

निसर्ग व पर्यावरण क्षेत्रातील निस्वार्थ कार्याबद्दल ठाणे येथे झाला सन्मान

अहमदनगर (प्रतिनिधी)- येथील सामाजिक कार्यकर्ते विजय भालसिंग यांना निसर्ग व पर्यावरण क्षेत्रात केलेल्या निस्वार्थ कार्याबद्दल ठाणे येथे राष्ट्रीय निसर्ग पर्यावरण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. राष्ट्रीय पर्यावरण संरक्षण बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या (ठाणे) वतीने आयोजित निसर्ग साधना सामाजिक संमेलनात भालसिंग यांना मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला.


ठाणे येथील मराठी ग्रंथ संग्रहालय, रेघे सभागृहात झालेल्या कार्यक्रमाप्रसंगी जेष्ठ अभिनेते चंद्रशेखर कुलकर्णी, माजी समाजकल्याण मंत्री बबनराव घोलप, सामाजिक कार्यकर्ते तथा उद्योजक दिनेश उघडे, सिने अभिनेते जाकीर खान, दिर्ग्दशक व लेखक अल्ताफ शेख, प्रा.डॉ. बी एन खरात, संस्थेचे अध्यक्ष विशालभाऊ देशमुख आदी उपस्थित होते.
सामाजिक, शैक्षणिक, धार्मिक, निसर्ग व पर्यावरण क्षेत्रात विजय भालसिंग गेल्या दोन दशकापासून योगदान देत आहे.

मुळगाव वाळकी (ता. नगर) येथील असलेले भालसिंग एसटी बॅकेत कार्यरत असून, कोणत्याही प्रकारचे शासकीय अनुदान व वर्गणी न घेता स्वखर्चातून सामाजिक कार्य करत आहे. वृक्षरोपण व संवर्धनासाठी ते सातत्याने योगदान देत आहे. उन्हाळ्यात पशु-पक्ष्यांना जगणे सुसह्य व्हावे म्हणून पाणवठे तयार करुन पाणी उपलब्ध करणे, विविध परिसरात पक्ष्यांसाठी झाडांवर धान्य व पाण्याची भांडी बसविणे, सर्वत्र वाढत चाललेल्या सिमेंटच्या जंगलामुळे पशु-पक्ष्यांचे अस्तित्व राहण्यासाठी नारळाच्या साली पासून कृत्रिमरीत्या पक्ष्यांसाठी बनवलेले घरटी बसविणे आदी निसर्ग व पर्यावरणपुरक उपक्रमाची दखल घेऊन भालसिंग यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. सदर पुरस्कार मिळाल्याबद्दल भालसिंग यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *