• Thu. Apr 24th, 2025

ईव्हीएम विरोधात वंचित बहुजन आघाडीचा एल्गार

ByMirror

Dec 3, 2024

राज्यभरात राबवणार स्वाक्षरी मोहीम

जिल्ह्यातही ईव्हीएम विरोधी जनआंदोलनाची हाक

नगर (प्रतिनिधी)- वंचित बहुजन आघाडीच्या वतीने राज्यभरात ईव्हीएम विरोधी जनआंदोलनाची हाक देण्यात आली आहे. स्वाक्षरी मोहिमेपासून सुरुवात करून टप्या टप्प्याने हे आंदोलन तीव्र करण्यात येणार आहे. या पार्श्‍वभूमीवर नगर जिल्ह्यातही वंचित बहुजन आघाडी ईव्हीएम विरोधी आंदोलन राज्य महासचिव प्रा. किसन चव्हाण, राज्य प्रवक्ते ॲड. अरुण जाधव, दक्षिण जिल्हाध्यक्ष योगेश साठे यांच्या मार्गदर्शनाखाली होणार आहे.
विधानसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्रात ईव्हीएमवर संशयाचे वातावरण निर्माण झालेले असताना, पुणे येथे वंचित बहुजन आघाडीच्या राज्य कार्यकारिणी बैठकीत आंदोलनाचा निर्णय घेण्यात आला. 3 डिसेंबर ते 16 डिसेंबर पर्यंत राज्यात ईव्हीएम विरोधी स्वाक्षरी मोहीम राबविण्यात येणार आहे.


वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. बाळासाहेब आंबेडकर यांनी व्हिडिओच्या माध्यमातून राज्यातील मतदारांना ईव्हीएम विरोधात स्वाक्षरी मोहिमेत सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. 2004 पासून ॲड. बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली ईव्हीएम विरोधात आंदोलन करण्यात येत आहे. ईव्हीएमच्या विरोधात न्यायालयीन लढाई सुद्धा ते लढत आहेत. पत्रकार परिषदेच्या माध्यमातून ईव्हीएम वापरामधील मधील अनेक घोळ त्यांनी माध्यमासमोर मांडले आहेत. ईव्हीएमच्या विरोधात आरपारची लढाई लढण्याचा निर्णय वंचित बहुजन आघाडीने घेतला असल्याचे जाहीर करण्यात आले आहे.


या ईव्हीएम विरोधातील आंदोलनात शहर जिल्हाध्यक्ष हनीफ शेख, शहर उपाध्यक्ष प्रवीण ओरे, शहर महासचिव अमर निर्भवणे, जिल्हा संघटक प्रसाद भिवसने, जिल्हा सल्लागार जे.डी. शिरसाठ, गणेश राऊत, बबलू भिंगारदिवे, आसिफ शेख, नगर तालुका अध्यक्ष मारुती पाटोळे, शेवगाव तालुका अध्यक्ष प्यारेलाल शेख, कर्जत तालुकाध्यक्ष पोपट शेटे, श्रीगोंदा अध्यक्ष संतोष जवंजाळ, युवा जिल्हाध्यक्ष सोमनाथ भैलुमे त्याचबरोबर सर्व जिल्हा, तालुका, शहर आणि युवा पदाधिकारी ही मोहीम आपापल्या विभागात राबवणार आहेत. सर्व मतदारांनी या मोहिमेत सहभागी होऊन ईव्हीएमला हद्दपार करण्यासाठी हातभार लावण्याचे आवाहन जिल्हाध्यक्ष योगेश साठे यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *