2 ऑक्टोबरला अजय साळवे यांच्या जलदान विधीच्या सर्वपक्षीय अभिवादन सभेला उपस्थिती
साळवे कुटुंबीयांची घेणार सांत्वनपर भेट; रिपाइं कार्यकर्त्यांना उपस्थित राहण्याचे आवाहन
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- केंद्रीय मंत्री तथा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले)चे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले गुरुवार दि. 1 ऑक्टोबर रोजी अहिल्यानगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. गुरुवारी रात्री उशिरा त्यांचे अहिल्यानगर येथील शासकीय विश्रामगृहात आगमन होऊन मुक्काम होणार आहे.
शुक्रवार दि. 2 ऑक्टोबर रोजी सकाळी 10.30 वाजता शासकीय विश्रामगृह येथे त्यांची पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली आहे. यानंतर सकाळी 11 वाजता निलक्रांती चौक येथील सिद्धी बाग परिसरात भगवान गौतम बुद्धांच्या पुतळ्याजवळ दिवंगत रिपब्लिकन नेते अजय साळवे यांच्या जलदान विधीनिमित्त आयोजित सर्वपक्षीय अभिवादन सभेस केंद्रीय मंत्री रामदास आठवले उपस्थित राहणार आहेत. यावेळी ते दिवंगत अजय साळवे यांना श्रद्धांजली अर्पण करणार आहेत.
अजय साळवे यांच्या निधनाने रिपब्लिकन चळवळीतील कार्यकर्त्यांमध्ये निर्माण झालेल्या दुःखाच्या पार्श्वभूमीवर आठवले हे साळवे कुटुंबीयांची सांत्वनपर भेट घेणार आहेत. कुटुंबीयांशी संवाद साधून त्यांच्या दुःखात सहभागी होणार आहे. या अभिवादन सभेस अहिल्यानगर शहरासह जिल्ह्यातील रिपब्लिकन पक्षाच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हाध्यक्ष सुनील साळवे व शहराध्यक्ष किरण दाभाडे यांनी केले आहे.
सकाळी 11 वाजता निलक्रांती चौक येथील सिद्धी बागेत भगवान गौतम बुद्धांच्या पुतळा परिसरात कार्यकर्त्यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या या दौऱ्यात रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष काकासाहेब खंबाळकर, राज्य उपाध्यक्ष तथा संपर्कप्रमुख श्रीकांत भालेराव, राज्य उपाध्यक्ष विजयराव वाकचौरे, उत्तर जिल्हाध्यक्ष सुरेंद्र थोरात, विभागीय अध्यक्ष भीमराज बागुल, जिल्हाध्यक्ष सुनील साळवे यांच्यासह जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत. अहिल्यानगर येथील नियोजित कार्यक्रम पूर्ण झाल्यानंतर केंद्रीय मंत्री रामदास आठवले हे चाकण-पुणे मार्गे मुंबईकडे रवाना होणार आहे.

