अंधोजन मंडळाच्या 15 ते 20 गरजू दिव्यांग बांधवांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- गणेशोत्सवाच्या -मंगलमय पर्वाचे औचित्य साधून अंधोजन मंडळाच्या गरजू अंध व दिव्यांग बांधवांना ॲडव्होकेट मित्र मंडळाच्या वतीने किराणा किटचे वाटप करण्यात आले. या सामाजिक उपक्रमातून सुमारे 15 ते 20 गरजू दिव्यांग बांधवांना जीवनावश्यक वस्तूंचे किराणा किट देण्यात आले.
ॲड. सचिन भोजने यांच्या संपर्क कार्यालयात अंधोजन मंडळाचे अध्यक्ष संभाजी भोर यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात आला. गणेशोत्सव हा* केवळ धार्मिक उत्सव न राहता समाजातील गरजू घटकांप्रती संवेदनशीलता आणि सामाजिक बांधिलकी जपण्याचे माध्यम ठरावे, या उद्देशाने ॲडव्होकेट मित्र मंडळाने हा उपक्रम आयोजित केला होता. यावेळी ॲड. सचिन भोजने, ॲड. संदीप पाखरे, ॲड. प्रवीण भोर, ॲड. तनवीर शेख, ॲड. प्रियंका खाटेकर, संतोष दरोडे, आदिनाथ भोजने, नाजीम शेख, समीर वखारे, संदीप भोगाडे, फरहान शेख, पराग काळे, संदीप लांडगे आणि ज्ञानेश्वर पाडेकर यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच अंधोजन मंडळाचे अध्यक्ष संभाजी भोर, अनिल चाबुकस्वार, गोरख दरंदळे, शाम कोकणे आणि मनेष वैराळ यांच्यासह मंडळाचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.
कार्यक्रमाची प्रस्तावना अंधोजन मंडळाचे अध्यक्ष संभाजी भोर यांनी केली. त्यांनी अंध व दिव्यांग बांधवांच्या विविध गरजा आणि त्यांच्या अडचणींवर प्रकाश टाकला. समाजातील गरजू घटकांना केवळ सहानुभूती न देता त्यांच्या दैनंदिन गरजांच्या वेळी प्रत्यक्ष मदतीचा हात देणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
गणेशोत्सवाच्या निमित्ताने ॲडव्होकेट मित्र मंडळाने पुढाकार घेऊन गरजू दिव्यांग बांधवांना जीवनावश्यक वस्तू उपलब्ध करून दिल्याबद्दल उपस्थितांनी समाधान व्यक्त केले. अशा उपक्रमांमुळे दिव्यांग बांधवांना आधार मिळण्याबरोबरच समाजात आपलेपणा आणि आत्मविश्वासाची भावना निर्माण होण्यास मदत होते, अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.
अंधोजन मंडळाच्या वतीने गरजू अंध व दिव्यांग बांधवांसाठी विविध सामाजिक उपक्रम सातत्याने राबविले जात आहेत. शिक्षण, आरोग्य तसेच दैनंदिन जीवनातील आवश्यक बाबींमध्ये मदतीची गरज असलेल्या व्यक्तींना शक्य ते सहकार्य करण्यात येत आहे.
या पार्श्वभूमीवर समाजातील सामाजिक कार्यकर्ते, लोकप्रतिनिधी, राजकीय नेते, उद्योजक, दानशूर व्यक्ती तसेच आर्थिकदृष्ट्या सक्षम नागरिकांनी अंध व दिव्यांग बांधवांच्या शिक्षण, आरोग्य आणि दैनंदिन गरजांसाठी पुढे यावे, असे आवाहन अंधोजन मंडळाच्या वतीने करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गोरख दरंदळे यांनी केले, तर अनिल चाबुकस्वार यांनी आभार मानले. उपस्थितांच्या सहभागाने गणेशोत्सवाच्या निमित्ताने राबविण्यात आलेला हा सामाजिक उपक्रम उत्साहात पार पडला.

