IBAUFBU चर्चेनंतर आंदोलन व संप स्थगित; डिसेंबरपर्यंत प्रभावी तोडगा व अंमलबजावणीचे आश्वासन
बँक कर्मचाऱ्यांचा संप स्थगित, मागे नाही! -प्रकाश कोटा
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- बँक कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांसंदर्भात इंडियन बँक्स असोसिएशन (IBA) आणि युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्स (UFBU) यांच्यात रविवारी दि. 27 सप्टेंबर रोजी रात्री 9.30 वाजता महत्त्वपूर्ण बैठक झाली. या बैठकीत सविस्तर चर्चा व विचारविनिमय झाल्यानंतर बँक कर्मचारी संघटनांनी प्रस्तावित केलेले आंदोलनाचे कार्यक्रम व संपाची कारवाई स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
मात्र, हा संप मागे घेण्यात आलेला नसून केवळ स्थगित करण्यात आला आहे, असे UFBU अहिल्यानगर युनिटचे तसेच बँक ऑफ महाराष्ट्र एम्प्लॉईज युनियन, पुणेचे ऑर्गनायझिंग सेक्रेटरी कॉ. प्रकाश भूमय्या कोटा यांनी स्पष्ट केले. डिसेंबरपर्यंत सर्व प्रलंबित मुद्यांवर प्रभावी तोडगा काढून त्याची अंमलबजावणी करण्याचे ठोस आश्वासन मिळाल्याने संप स्थगित करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
उर्वरित शनिवार सुट्टी जाहीर करण्याच्या मागणीवर IBA आणि UFBU यांची उच्चस्तरीय समिती तातडीने स्थापन करण्यात येणार आहे. ही समिती या प्रश्नावर सविस्तर चर्चा करून सर्व संभाव्य पर्यायांचा विचार करणार आहे. तसेच संबंधित सर्व घटकांशी चर्चा करून, विशेषतः बँक ग्राहकांच्या हिताचा विचार करून सर्वांना स्वीकार्य असा तोडगा काढण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.
स्केल-IV व त्यावरील अधिकाऱ्यांसाठी लागू असलेल्या PLI (परफॉर्मन्स लिंक्ड इन्सेन्टिव्ह) योजनेबाबतही चर्चा करण्यात आली. संघटना व असोसिएशनने उपस्थित केलेल्या आक्षेपांचा व मुद्द्यांचा विचार करून योजनेत आवश्यक बदल करण्यासाठी सरकारकडे प्रस्ताव मांडण्याबाबत IBAसोबत पुढील चर्चा केली जाणार आहे.
8 मार्च 2024 रोजीच्या बैठकीच्या इतिवृत्तात नमूद करण्यात आलेल्या विविध प्रलंबित प्रश्नांवर IBA आणि UFBU यांच्यात चर्चा करून ते प्रश्न तातडीने मार्गी लावण्याच्या दृष्टीने कार्यवाही केली जाणार आहे. त्यामुळे बँक कर्मचाऱ्यांच्या मागण्यांबाबत पुढील काळात चर्चेच्या माध्यमातून ठोस निर्णय होण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.
दरम्यान, या निर्णयाबाबत अधिक माहिती देताना कॉ. प्रकाश भूमय्या कोटा यांनी सांगितले की, “संप मागे घेतलेला नाही, तर स्थगित केला आहे. संघटनेचा मुख्य हेतू संप करणे नसून मागण्या पूर्ण करून घेणे हा आहे त्यामुळे डिसेंबरपर्यंत सर्व मुद्यांवर प्रभावी तोडगा काढून त्याची अंमलबजावणी करण्याचे ठोस आश्वासन देण्यात आले आहे. त्यामुळे सध्या प्रस्तावित आंदोलन व संप स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.” या बैठकीनंतर C.H. वेंकटचलम (AIBEA), रुपम रॉय (AIBOC), एल. चंद्रशेखर (NCBE), संजय खान (AIBOA), देबाशीष बसू चौधरी (BEFI), प्रेम मक्कर (INBOC) आणि ओ. पी. शर्मा (INBEF) यांनी संयुक्तरीत्या याबाबत माहिती दिली. या निर्णयाचे सविस्तर परिपत्रक पुढे जारी करण्यात येणार असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.

