संविधान वाटपातून आंबेडकरी विचारांचा प्रसार
संविधान हे लोकशाहीचे आधारस्तंभ -अनिल साळवे
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135 व्या जयंतीनिमित्त शहरातील उमेद सोशल फाऊंडेशनच्या वतीने संविधान वाटपाचा उपक्रम राबविण्यात आला. या माध्यमातून विविध सामाजिक संस्था व युवक मंडळांच्या प्रतिनिधींना भारतीय संविधानाच्या प्रतींचे वितरण करण्यात आले.

मार्केटयार्ड परिसरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून या अभियानाची सुरुवात करण्यात आली. यावेळी उपस्थितांनी बाबासाहेबांच्या विचारांना अभिवादन करत संविधानाचे महत्त्व अधोरेखित केले. या कार्यक्रमास फाऊंडेशनचे अध्यक्ष अनिल साळवे, सचिव सचिन साळवी, जय युवा असोसिएशनचे अध्यक्ष ॲड. महेश शिंदे, सल्लागार ॲड. दीपक धिवर, सदस्य प्रकाश भालेराव, रवी साखरे, माहेर फाऊंडेशनच्या अध्यक्षा रजनी ताठे, ॲड. विद्या शिंदे, तन्वी साळवे, स्तवन साळवे, प्राची भालेराव, परी भालेराव, विजय लोंढे, रवी सुरेकर आदी मान्यवर उपस्थित होते.
संविधान वाटप उपक्रमाच्या माध्यमातून युवकांमध्ये कायदेविषयक जाणीव निर्माण करणे, तसेच सामाजिक समता, बंधुता व न्याय या मूल्यांचा प्रसार करणे हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश असल्याचे आयोजकांनी सांगितले. आजच्या काळात संविधानाची जाणीव असणे अत्यंत आवश्यक असून, समाजातील प्रत्येक घटकाने आपल्या हक्कांसोबतच कर्तव्यांचीही जाणीव ठेवली पाहिजे, असा संदेश या उपक्रमातून देण्यात आला.
अनिल साळवे म्हणाले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला दिलेले संविधान हे लोकशाहीचे आधारस्तंभ आहे. आजच्या युवकांना संविधानाची माहिती असणे अत्यंत गरजेचे आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून आम्ही प्रत्येक तरुणापर्यंत संविधान पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहोत. संविधान वाचन आणि त्यातील मूल्यांचे आचरण केल्यासच समाजात खऱ्या अर्थाने समता आणि न्याय प्रस्थापित होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
ॲड. महेश शिंदे म्हणाले की, संविधान हे केवळ एक कायद्याचे पुस्तक नसून ते प्रत्येक नागरिकाच्या हक्कांचे रक्षण करणारे दस्तऐवज आहे. युवकांनी संविधानाचा अभ्यास करून आपल्या अधिकारांची जाणीव ठेवावी आणि समाजात अन्यायाविरुद्ध आवाज उठवावा. अशा उपक्रमांमुळे समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्याची प्रेरणा मिळत असल्याचे त्यांनी सांगितले.
सचिन साळवी म्हणाले की, उमेद सोशल फाऊंडेशनच्या माध्यमातून आम्ही सामाजिक उपक्रम सातत्याने राबवत आहोत. भीम जयंतीनिमित्त संविधान वाटप हा एक छोटासा प्रयत्न असला तरी त्यातून मोठा संदेश जातो. येणाऱ्या काळातही अशा प्रकारचे जनजागृतीपर उपक्रम राबवून समाजात जागरूकता निर्माण करण्याचा मानस असल्याचे ते म्हणाले.
