आरक्षण वर्गवारीची अंमलबजावणी तात्काळ करण्याची मागणी
अण्णाभाऊ साठे हे वंचितांच्या संघर्षाचा बुलंद आवाज -सुनिल शिंदे
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त सिद्धार्थनगर येथील त्यांच्या पुतळ्यास आईसाहेब बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. या कार्यक्रमात समाजबांधवांनी मोठ्या संख्येने सहभाग घेत अण्णाभाऊ साठे यांच्या कार्याचा गौरव केला. यावेळी परिसर ‘लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या घोषणांनी दुमदुमून गेला.
कार्यक्रमात संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सुनील शिंदे यांच्या हस्ते लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आले. उपस्थितांनी फुले अर्पण करून त्यांच्या सामाजिक, साहित्यिक आणि परिवर्तनवादी कार्याला अभिवादन केले. यावेळी प्रेम गाडे, सुनील उमाप, जयवंत गायकवाड, सतीश बोरुडे, आनंद बोरुडे, शासनाचा पुरस्कार प्राप्त डॉ. सुनील सकट, अभिषेक बोरुडे, अतुल जगधने, परशुराम शिंदे, महादेव नेटके यांच्यासह समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
अण्णाभाऊ साठे यांनी आपल्या साहित्याच्या माध्यमातून समाजातील शोषित, वंचित, कष्टकरी आणि कामगार वर्गाच्या वेदना, संघर्ष आणि स्वाभिमानाला आवाज दिला. त्यांच्या विचारांचा वारसा समाजासाठी आजही प्रेरणादायी असल्याचे यावेळी उपस्थितांनी नमूद केले. यावेळी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीला राज्य शासनाने शासकीय सुट्टी जाहीर करावी, त्यांना मरणोत्तर ‘भारतरत्न’ हा सर्वोच्च नागरी सन्मान प्रदान करावा तसेच मागासवर्गीयांच्या आरक्षण वर्गवारीची तातडीने अंमलबजावणी करावी, अशी मागणी उपस्थितांनी केली.
सुनील शिंदे म्हणाले की, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी आपल्या प्रभावी लेखणीच्या माध्यमातून समाजात परिवर्तनाची नवी चेतना निर्माण केली. दलित, शोषित, कामगार आणि वंचित घटकांचे जीवन, त्यांचे संघर्ष, वेदना आणि स्वप्ने त्यांनी आपल्या साहित्यामधून जिवंत केली. त्यांचे साहित्य हे केवळ साहित्यिक ठेवा नसून सामाजिक क्रांतीचा दस्तऐवज आहे. अण्णाभाऊ साठे यांचा सन्मान म्हणजे समाजातील कष्टकरी, वंचित आणि उपेक्षित घटकांचा सन्मान असल्याचे त्यांनी सांगितले.
सुनील उमाप म्हणाले की, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे हे केवळ लेखक किंवा कवी नव्हते, तर ते समाजाचा खरा आरसा होते. त्यांनी संपूर्ण आयुष्य वंचित आणि उपेक्षित समाजाच्या हक्कांसाठी वाहिले. त्यांच्या साहित्याने सामाजिक परिवर्तनाची दिशा दिली. त्यांना ‘भारतरत्न’ हा सर्वोच्च नागरी सन्मान मिळावा, ही केवळ एका समाजाची मागणी नसून देशातील सर्व कष्टकरी, वंचित आणि सामाजिक न्यायावर विश्वास ठेवणाऱ्या नागरिकांची भावना असल्याचे ते म्हणाले.

