• Thu. Jul 23rd, 2026

Mirrornews24

Marathi News

निराधार ज्येष्ठांना छत्री वाटप, मिष्टान्न भोजन व रक्तदान शिबिर

ByMirror

Jul 23, 2026
निराधार ज्येष्ठांना छत्री वाटप, मिष्टान्न भोजन व रक्तदान शिबिर

भिंगार राष्ट्रवादी काँग्रेसचा स्व. अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त उपक्रम

अहिल्यानगर (प्रतिनिधी)- भिंगार येथे राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री स्व. अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त भिंगार राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करून त्यांना अनोखी आदरांजली वाहण्यात आली. पावसाळ्याच्या पार्श्‍वभूमीवर रोकडेश्‍वर हनुमान मंदिर परिसरात निराधार ज्येष्ठ नागरिकांना छत्र्यांचे वाटप करण्यात आले. त्यानंतर त्यांना मिष्टान्न भोजन देण्यात आले. याचबरोबर आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिरात युवकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला.


आमदार संग्राम जगताप व राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष संपत बारस्कर यांच्या मार्गदर्शनाखाली भिंगार राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून हा सेवाभावी उपक्रम राबविण्यात आला. समाजातील गरजू घटकांप्रती संवेदनशीलता जपत स्व. अजित पवार यांच्या कार्याचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून ही जयंती समाजोपयोगी पद्धतीने साजरी करण्यात आली.


कार्यक्रमादरम्यान ज्येष्ठ नागरिकांना छत्र्यांचे वाटप करून त्यांच्या आरोग्याची व सुरक्षिततेची काळजी घेण्याचा संदेश देण्यात आला. तसेच रक्तदान शिबिरात अनेक युवकांनी स्वयंस्फूर्तीने रक्तदान करून गरजू रुग्णांसाठी जीवनदायी योगदान दिले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे भिंगार शहराध्यक्ष संजय सपकाळ, मीडिया सेलचे शहर जिल्हाध्यक्ष मारुती पवार, राष्ट्रवादी युवक काँग्रेस भिंगार शहराध्यक्ष शिवम भंडारी, दीपक लिपाने, संपत बेरड, सिद्धार्थ आढाव, प्रशांत डावरे, सुदाम गांधले, विलास तोडमल, अक्षय नागापुरे, राजू जंगम, दिनेश लंगोटे, सागर चवंडके, प्रमोद जाधव, संतोष हजारे, निखिल शिंदे, दीपक राहींज, मतीन ठाकरे, रासने भैय्या, बेरड काका, चेतन वसगडेकर, राजेश तनपुरे, वसंत राठोड यांच्यासह राष्ट्रवादीचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


शिवम भंडारी म्हणाले की, स्व. अजित पवार यांनी जनतेच्या प्रश्‍नांना प्राधान्य देत विकासाभिमुख राजकारणाची दिशा दिली. त्यांच्या कार्यातून प्रेरणा घेऊन राष्ट्रवादी युवक काँग्रेस समाजोपयोगी उपक्रम सातत्याने राबवत आहे. जयंती केवळ औपचारिक न साजरी करता गरजू नागरिकांच्या चेहऱ्यावर आनंद फुलविणे आणि रक्तदानासारख्या जीवनदायी कार्यात युवकांना सहभागी करून घेणे, हीच त्यांना खरी आदरांजली आहे. आगामी काळातही युवकांना सोबत घेऊन विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.


संजय सपकाळ म्हणाले की, “समाजसेवा हीच स्व. अजित पवार यांच्या कार्याला खरी श्रद्धांजली आहे. राजकारणासोबत सामाजिक जबाबदारी पार पाडणे हे प्रत्येक कार्यकर्त्याचे कर्तव्य आहे. ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान, गरजूंना मदतीचा हात आणि रक्तदानासारख्या उपक्रमांमुळे समाजात सकारात्मक संदेश देण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
मारुती पवार म्हणाले की, रक्तदान हे सर्वोत्तम दान मानले जाते. एका रक्तदात्यामुळे अनेकांचे प्राण वाचू शकतात. युवकांनी मोठ्या संख्येने रक्तदान करून समाजाप्रती असलेली आपली जबाबदारी सिद्ध केली आहे. स्व. अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त आयोजित हा उपक्रम समाजात सेवा, सहकार्य आणि मानवतेची भावना अधिक दृढ करणारा ठरला असल्याचे त्यांनी सांगितले.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *