• Thu. Jul 30th, 2026

Mirrornews24

Marathi News

8 ऑगस्टपासून देशभर ‘जंतर-मंतर क्रांती’चा एल्गार!

ByMirror

Jul 29, 2026
8 ऑगस्टपासून देशभर ‘जंतर-मंतर क्रांती’चा एल्गार!

‘सत्ता जनतेच्या नियंत्रणात आणा’; पीपल्स हेल्पलाईन व भारतीय जनसंसदेचे अभियान


तिरंग्याचे तीन रंगलोकभक्ती, ज्ञानभक्ती, कर्मभक्ती; अशोकचक्र भारतीय संविधानाचे सर्वोच्च अधिष्ठान!


व्यक्तिपूजा, घराणेशाही, जातीयवाद, धर्मांधता, धनशक्ती आणि निष्क्रिय नोकरशाहीविरुद्ध लोकशाही मुक्तिसंग्राम


अहिल्यानगर (प्रतिनिधी)- भारतीय संसदीय लोकशाहीला व्यक्तिपूजा, घराणेशाही, जातीय समीकरणे, धार्मिक ध्रुवीकरण, भ्रष्टाचार, धनशक्ती आणि जनविरोधी नोकरशाहीच्या विळख्यातून मुक्त करून संविधानाधिष्ठित, उत्तरदायी आणि जनकेंद्रित लोकशाही व्यवस्था निर्माण करण्याच्या उद्देशाने येत्या 8 ऑगस्ट 2026 पासून देशभर ‘जंतर-मंतर क्रांतीदिन’ या नावाने व्यापक जनजागृती आंदोलन सुरू करण्यात येणार आहे. या आंदोलनाच्या माध्यमातून नागरिकांमध्ये लोकशाहीविषयी जागरूकता निर्माण करून शासन आणि निवडणूक व्यवस्थेत मूलभूत परिवर्तन घडवून आणण्याचा संकल्प करण्यात आला असल्याची माहिती पीपल्स हेल्पलाईन आणि भारतीय जनसंसदेचे संस्थापक ॲड. कारभारी गवळी व अशोक सब्बन यांनी दिली.
या आंदोलनाचा मुख्य उद्देश भारतीय लोकशाहीला लोकभक्ती, ज्ञानभक्ती आणि कर्मभक्ती या त्रिसूत्रीवर उभे करणे हा असून, सत्तेचे केंद्र नागरिक असावेत, लोकप्रतिनिधी व नोकरशाही जनतेसमोर उत्तरदायी असावी आणि शासनाची प्रत्येक कृती संविधानाच्या चौकटीत राहून लोकहितासाठी व्हावी, अशी भूमिका आंदोलनातून मांडण्यात आली आहे.
आंदोलनाच्या घोषणेनुसार भारतीय राष्ट्रध्वजाचे घटनात्मक स्वरूप कायम ठेवत तिरंग्यातील तीन रंगांना नव्या लोकशाही मूल्यांचे प्रतीकात्मक स्वरूप देण्यात आले आहे.


भगवा लोकभक्ती : सत्ता ही जनतेच्या सेवेसाठी मिळालेली अमानत आहे. प्रत्येक नागरिकाचा सन्मान, सामाजिक न्याय, पर्यावरण संवर्धन आणि सर्व जीवसृष्टीचे कल्याण हे शासनाचे अंतिम ध्येय असले पाहिजे. व्यक्तिपूजा किंवा सत्तापूजा नव्हे, तर जनतेप्रती निष्ठा हीच खरी लोकभक्ती असल्याचे आंदोलनकर्त्यांनी स्पष्ट केले.
पांढरा ज्ञानभक्ती : शासन अंधश्रद्धा, अफवा किंवा प्रचाराच्या आधारावर नव्हे, तर संविधानिक मूल्ये, वैज्ञानिक दृष्टिकोन, आधुनिक तंत्रज्ञान, कृत्रिम बुद्धिमत्ता आणि अद्ययावत ज्ञानाच्या आधारावर चालले पाहिजे. माहितीपूर्ण, विवेकनिष्ठ आणि वैज्ञानिक विचारसरणी हीच प्रगत लोकशाहीची खरी ओळख असल्याचे या आंदोलनातून अधोरेखित करण्यात आले आहे.
हिरवा कर्मभक्ती : घोषणाबाजी, भाषणे आणि निवडणुकीतील आश्‍वासनांपेक्षा निश्‍चित वेळेत पूर्ण झालेली गुणवत्तापूर्ण विकासकामे, जनकल्याणकारी योजना आणि प्रत्यक्ष परिणामकारक कार्य हीच लोकप्रतिनिधींची खरी परीक्षा असावी. कामाच्या आधारेच सत्तेचे मूल्यमापन झाले पाहिजे, अशी भूमिका मांडण्यात आली.


आंदोलनकर्त्यांनी स्पष्ट केले की, तिरंग्याच्या मध्यभागी असलेले अशोकचक्र हे भारतीय संविधान, कायद्याचे राज्य, न्याय, स्वातंत्र्य, समता आणि बंधुता या घटनात्मक मूल्यांच्या अखंड गतिशीलतेचे प्रतीक राहील. त्यामुळे लोकशाहीचा पाया संविधानावरच दृढ राहील, असा संदेश या अभियानातून दिला जाणार आहे.
आगामी लोकसभा, विधानसभा, पंचायत राज संस्था आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये मतदारांनी उमेदवारांची निवड जात, धर्म, पैसा, पक्ष, घराणेशाही किंवा गुंडशक्तीच्या आधारे न करता त्यांच्या कार्यक्षमतेच्या आधारे करावी, असे आवाहन करण्यात आले आहे. प्रत्येक मतदाराने उमेदवाराला तीन मूलभूत प्रश्‍न विचारावेत त्याने जनतेसाठी काय केले? त्याच्याकडे आधुनिक ज्ञान किती आहे? आणि त्याच्या कामाचे प्रत्यक्ष परिणाम काय आहेत? या तीन प्रश्‍नांची समाधानकारक उत्तरे म्हणजेच लोकभक्ती, ज्ञानभक्ती आणि कर्मभक्तीची खरी सार्वजनिक परीक्षा ठरेल, असे आंदोलनकर्त्यांनी नमूद केले.
यावेळी नोकरशाहीच्या भूमिकेवरही भाष्य करण्यात आले. शासकीय अधिकारी हे जनतेचे मालक नसून संविधानबद्ध आणि वेतनधारी लोकसेवक आहेत. त्यांच्या पदोन्नतीचा आधार फाईलींची संख्या नसून नागरिकांच्या समस्या किती सोडवल्या, भ्रष्टाचार किती रोखला, न्याय किती दिला आणि शासनाचा लाभ किती प्रभावीपणे लोकांपर्यंत पोहोचवला, यावर असावा, अशी मागणी करण्यात आली.


प्रत्येक शासकीय विभाग, स्थानिक स्वराज्य संस्था आणि लोकप्रतिनिधींचा नियमित सार्वजनिक लोकलेखाजोखा (Public Audit) घेण्याची व्यवस्था निर्माण करण्याची मागणीही आंदोलनातून करण्यात आली आहे. लोकशाही म्हणजे केवळ पाच वर्षांतून एकदा मतदान करून शांत बसणे नसून, लोकप्रतिनिधींना प्रश्‍न विचारणे, नोकरशाहीवर लोकनियंत्रण ठेवणे, सार्वजनिक निधीचा हिशेब मागणे आणि निष्क्रिय सत्तेला मतपेटीतून नाकारण्याचा अधिकार व जबाबदारी प्रत्येक नागरिकाची आहे, असेही संघटनेच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.


8 ऑगस्टपासून देशातील गावे, शहरे, विद्यापीठे, शेतकरी संघटना, कामगार वस्त्या आणि युवक मंचांमध्ये लोकशाही जनजागृती अभियान राबविण्यात येणार आहे. विविध सभा, चर्चासत्रे, जनसंवाद, संविधान वाचन आणि नागरिकांशी थेट संवादाच्या माध्यमातून या आंदोलनाचा विस्तार करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली. तसेच “माझा तिरंगा लोकभक्ती, ज्ञानभक्ती, कर्मभक्ती; माझे अशोकचक्र भारतीय संविधान” हा महामंत्र देशव्यापी लोकशाही परिवर्तनाचा संदेश ठरेल, असा विश्‍वास व्यक्त करत ॲड. कारभारी गवळी यांनी नागरिकांना या जनआंदोलनात सक्रिय सहभाग घेण्याचे आवाहन केले. या आंदोलनासाठी प्रकाश थोरात, ॲड. अमित थोरात, शाहीर कान्हू सुंबे, ॲड. लक्ष्मणराव पोकळे, वीरबहादूर प्रजापती, संतोष खामकर, ओम कदम, पोपट शेळके, धनंजय मडके, कैलास पठारे, ॲड. विद्या शिंदे, राजेंद्र कर्डिले, दिलीप घुले, प्रकाश गोसावी यांच्यासह अनेक कार्यकर्ते प्रयत्नशील आहेत.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *