• Fri. Jul 24th, 2026

Mirrornews24

Marathi News

सामाजिक कार्यकर्ते विजय भालसिंग पुणे येथील राज्यस्तरीय गुणगौरव सोहळ्यास प्रमुख पाहुणे म्हणून निमंत्रित

ByMirror

Jul 24, 2026

क्रांती दिनाच्या पूर्वसंध्येला होणार राज्यातील सामाजिक कार्यकर्त्यांचा विशेष सन्मान

अहिल्यानगर (प्रतिनिधी)- स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्‍वभूमीवर तसेच क्रांती दिनाच्या पूर्वसंध्येला पुणे येथील वानवडी परिसरात आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय गुणगौरव सोहळ्यास सामाजिक कार्यकर्ते विजय भालसिंग यांना प्रमुख पाहुणे म्हणून निमंत्रित करण्यात आले आहे. विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींच्या कार्याचा गौरव करण्यासाठी आयोजित करण्यात आलेला हा सोहळा दि. 8 ऑगस्ट रोजी सायंकाळी महात्मा ज्योतिराव फुले सांस्कृतिक भवन, वानवडी (पुणे) येथे उत्साहात पार पडणार आहे.


मातोश्री द्रोपदा बबन पठारे चॅरिटेबल ट्रस्ट, छत्रपती शेतकरी सेना, बहुजन भूमी संघटना संचलित मानव हक्क, माहिती अधिकार, दक्ष पोलिस मित्र सहकार सेना यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. समाजातील विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींच्या योगदानाचा गौरव करून त्यांना प्रोत्साहन देण्याचा या सोहळ्याचा मुख्य उद्देश आहे.


या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई, मुंबईतील प्रसिद्ध कोळी नटसम्राट राजेश खर्डे वेसावकर, महाराष्ट्र पोलिस दलातील सोहेल काझी, सिनेचित्रपट अभिनेते गणेश पदमाळे, वानवडीच्या माजी नगरसेविका हसीना इनामदार यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित राहणार आहेत. राज्यभरात सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, पर्यावरण आणि जनकल्याणाच्या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना या सोहळ्यात सन्मानित करण्यात येणार असल्याची माहिती संस्थापक अध्यक्ष कैलास पठारे यांनी दिली.


सामाजिक कार्यकर्ते विजय भालसिंग हे गेल्या जवळपास वीस वर्षांपासून समाजहितासाठी सातत्याने कार्यरत आहेत. एसटी बँकेत नोकरी सांभाळत असतानाही त्यांनी समाजसेवेची वाट निवडली असून, कोणतेही शासकीय अनुदान अथवा वर्गणी न घेता स्वतःच्या खर्चातून विविध सामाजिक उपक्रम राबविले आहेत. ग्रामीण भागातील नागरिकांच्या समस्या, मूलभूत सुविधांचा अभाव, पर्यावरण संवर्धनाची गरज आणि जनजागृतीची आवश्‍यकता लक्षात घेऊन त्यांनी अनेक उपक्रम यशस्वीपणे राबविले आहेत.


पर्यावरण संरक्षण आणि जैवविविधतेचे संवर्धन हे त्यांच्या कार्याचे प्रमुख वैशिष्ट्य मानले जाते. वृक्षारोपण आणि वृक्षसंवर्धन मोहिमांमध्ये त्यांनी सक्रिय सहभाग घेतला असून, लावलेल्या वृक्षांचे संगोपन करून हरित क्षेत्र वाढविण्यासाठी त्यांनी विशेष प्रयत्न केले आहेत. पर्यावरणाबाबत जनजागृती निर्माण करण्यासाठी विविध शाळा, महाविद्यालये आणि सामाजिक संस्थांच्या माध्यमातून त्यांनी प्रभावी उपक्रम राबविले आहेत. पाणीटंचाई, रस्त्यांची दुरवस्था, मूलभूत सुविधा, सार्वजनिक प्रश्‍न तसेच स्थानिक विकासकामांबाबत त्यांनी सातत्याने संबंधित शासकीय विभागांकडे पाठपुरावा करून अनेक प्रश्‍न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न केले आहेत. जनतेच्या समस्यांप्रती असलेली त्यांची बांधिलकी आणि निस्वार्थ सामाजिक कार्य याची दखल घेऊनच त्यांना या गुणगौरव सोहळ्यास प्रमुख पाहुणे म्हणून निमंत्रित करण्यात आले आहे.


या राज्यस्तरीय गुणगौरव सोहळ्याच्या यशस्वी आयोजनासाठी राष्ट्रीय उपाध्यक्ष रशीद पठाण, राष्ट्रीय युवक उपाध्यक्ष विशाल पवार, राष्ट्रीय वरिष्ठ अध्यक्ष कीर्ती पांडे, राष्ट्रीय उपाध्यक्ष सुनंदा खंडाळकर, महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष सोनू चौधरी, राष्ट्रीय अध्यक्ष रोहिणी भोसले तसेच महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष पल्लवी पाटील हे विशेष प्रयत्नशील आहेत.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *