दिवाळी फराळसाठी लागणारे साहित्याची बालघर प्रकल्पाला भेट
नगर (प्रतिनिधी)- श्री सांदिपनी अकॅडमीच्या विद्यार्थ्यांनी समाजातील वंचित व निराधार बालकांसह तपोवन रोड येथील बालघर प्रकल्पात दिवाळी साजरी केली. वंचित घटकातील मुलांची दिवाळी गोड करण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला होता. लखलखत्या पणत्यांचा झगमगाटात व फटाक्यांच्या आतषबाजीत दिवाळीचा आनंद वंचितांसह साजरा करण्यात आला.
श्री सांदिपनी अकॅडमी दरवर्षी आपल्या विद्यार्थ्यांसह बालघर प्रकल्पातील मुलांसह दिवाळी साजरी करत असतात. यावर्षी अकॅडमीच्या वतीने संस्थेतील मुलांसाठी दिवाळीला फराळ करण्यासाठी लागणारे सर्व किराणा साहित्याची भेट दिली. तर संस्थेच्या मुलांनी बनवलेल्या पणत्या, आकाश दिव्यांच्या स्टॉलवरुन अकॅडमीच्या विद्यार्थ्यांनी खेरेदी करुन त्यांना प्रोत्साहन दिले.
अकॅडमीचे व्यवस्थापकीय संचालक के. बालराजू यांच्या मार्गदर्शनाखाली व बालघर प्रकल्पाचे युवराज गुंड यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये या कार्यक्रमाची सुरुवात झाली. यावेळी अकॅडमीचे प्रा. नानासाहेब बारहाते, प्रा. राहुल गुजराल, अतिश काळे, सुधीर काळे, सामाजिक कार्यकर्ते मोहसीन सय्यद आदींसह अकॅडमीचे शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.
के. बालराजू यांनी दिवाळी सणाचा आनंद साजरा करून, तो आनंद वाटायचा असतो. समाजातील दुःखाचा अंधकार दूर करण्यासाठी प्रत्येकाने योगदान देण्याचे त्यांनी आवाहन केले. बालघर प्रकल्पातील मुलांसह विद्यार्थ्यांनी फटाक्यांच्या आतषबाजीत दिवाळीचा आनंद घेतला.