भारतीय लहुजी सेना व भटक्या विमुक्त समाज संघटनेचा पुढाकार
आज लावलेले वृक्षच उद्याच्या पिढीला शुद्ध हवा व सुरक्षित पर्यावरण देतील -सुनिल सकट
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- जागतिक पर्यावरण दिनानिमित्त शहरातील जानकीबाई आपटे मूकबधिर विद्यालयात भारतीय लहुजी सेनेच्या वतीने वृक्षारोपण अभियान राबविण्यात आले. पर्यावरण संवर्धन, वृक्षसंवर्धन आणि हरित भविष्यासाठी समाजात जनजागृती करण्याच्या उद्देशाने हा उपक्रम उत्साहात पार पडला. वृक्षारोपण करून पर्यावरण संरक्षणाचा संदेश देण्यात आला.
कार्यक्रमाची सुरुवात विद्यालयाचे मुख्याध्यापक विजय आरोटे यांच्या हस्ते वृक्षारोपण करून करण्यात आली. भारतीय लहुजी सेनेचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष सुनील सकट आणि भटक्या विमुक्त समाज संघटनेचे शहराध्यक्ष राजाभाऊ वाडेकर यांच्या पुढाकाराने हा उपक्रम आयोजित करण्यात आला. यावेळी प्रशांत मस्तूद, सचिन घुमरे यांच्यासह शिक्षक, कर्मचारी उपस्थित होते.
वृक्षारोपणानंतर उपस्थितांनी लावलेल्या वृक्षांचे संगोपन करण्याचा संकल्प केला. पर्यावरणाचे वाढते प्रश्न, तापमानवाढ, प्रदूषण आणि जंगलतोड याबाबत जनजागृती करण्यात आली. तसेच प्रत्येकाने आपल्या आयुष्यात किमान एक तरी वृक्ष लावून त्याचे संवर्धन करण्याचे आवाहन करण्यात आले.
सुनील सकट म्हणाले की, पर्यावरणाचे संतुलन राखण्यासाठी वृक्षारोपण ही काळाची गरज आहे. दिवसेंदिवस वाढणारे प्रदूषण, जंगलतोड आणि हवामानातील बदल ही चिंतेची बाब आहे. वृक्ष हे केवळ ऑक्सिजनचे स्रोत नसून संपूर्ण सजीव सृष्टीचे जीवनाधार आहेत. पर्यावरण संवर्धनासाठी प्रत्येक नागरिकाने जबाबदारी स्वीकारून वृक्षारोपणाबरोबरच त्यांचे संगोपन करणे आवश्यक आहे. समाजातील प्रत्येक घटकाने पर्यावरण रक्षणाच्या चळवळीत सहभागी होणे ही काळाची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.
राजाभाऊ वाडेकर म्हणाले की, आजची पिढी आणि उद्याचे भविष्य सुरक्षित ठेवण्यासाठी वृक्षारोपणासोबतच प्लास्टिकमुक्ती, पाणी संवर्धन आणि स्वच्छतेच्या उपक्रमांवर भर देणे आवश्यक आहे. विशेष मुलांच्या शाळेत पर्यावरण दिन साजरा करण्यामागे त्यांच्यामध्येही निसर्गप्रेम आणि पर्यावरणाबद्दलची जाणीव निर्माण करण्याचा उद्देश असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
मुख्याध्यापक विजय आरोटे म्हणाले की, “विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी पर्यावरण शिक्षण अत्यंत महत्त्वाचे आहे.
वृक्षारोपणासारख्या उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक बांधिलकी, निसर्गप्रेम आणि पर्यावरणाबाबतची संवेदनशीलता वाढते. विशेष विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष कृतीतून पर्यावरण संवर्धनाचे महत्त्व समजावून सांगण्यासाठी अशा उपक्रमांची मोठी आवश्यकता असल्याचे त्यांनी सांगितले.
