बहुजन समाज पार्टीची मागणी
कोपरगाव येथील युवकास मारहाण प्रकरणातील आरोपींना अटक करण्याची व अन्न सुरक्षा योजनेचा लाभ देण्याची मागणी
अहमदनगर (प्रतिनिधी)- पुणे येथील हिट ॲण्ड रन प्रकरणातील आरोपींना पाठिशी घालणाऱ्यांवर कठोर कारवाई व्हावी, कोपरगाव येथील युवकास मारहाण प्रकरणातील आरोपींना अटक व्हावी व अन्न सुरक्षा योजनेच्या शहरातील लाभार्थींना रेशनिंगच्या अन्न-धान्याचा लाभ मिळण्याची मागणी बहुजन समाज पार्टीच्या वतीने करण्यात आली.
या मागणीसाठी बसपाच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी कार्यालय व पोलीस अधीक्षक कार्यालयात निवेदन देण्यात आले. यावेळी बसपाचे जिल्हाध्यक्ष उमाशंकर यादव, जिल्हा प्रभारी सुनील ओव्हळ, जिल्हा उपाध्यक्ष शहानवाज शेख, शहराध्यक्ष फिरोज शेख पत्रेवाला, विधानसभा प्रभारी गणेश बागल, विधानसभा अध्यक्ष बाळासाहेब काते, तुकाराम भवळ, उस्मान शेख आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
पुणे येथील हिट ॲण्ड रन प्रकरणात अल्पवयीन मुलाच्या निष्काळजीपणाने निष्पाप युवक व युवतीचा बळी गेला आहे. या प्रकरणातील आरोपी मुलाचे वडिल मोठे बांधकाम व्यावसायिक असल्याने हे प्रकरण दडपण्याचे प्रयत्न सुरु आहे. या प्रकरणात आरोपींना पाठिशी घालणाऱ्यांवर कठोर कारवाई करुन आरोपीस शिक्षा व्हावी.
तर कोपरगाव येथील युवक अमिर मोहमंद पठाण याला मारहाण करणारे सनी गायकवाड, बंटी रमेश भोपे, निलेश दादा पवार, जितू खांडेकर, राहुल जोगदंड (सर्व रा. कोपरगाव) यांच्यावर गुन्हा दाखल होऊनही त्यांना अटक करण्यात आलेली नाही. याप्रकरणातील आरोपींना तातडीने अटक करुन पिडीत कुटुंबाला संरक्षण देण्याचे निवेदनात म्हंटले आहे.
शहरात अन्न सुरक्षा योजनेच्या अनेक लाभार्थींना रेशनिंगचे धान्य दिले जात नाही. रेशनिंग दुकानदार सर्वसामान्य नागरिकांशी अरेरावीची भाषा करुन उडवाउडवीची उत्तरे देतात. अल्पसंख्यांक लाभार्थींना हक्काच्या अन्न-धान्यापासून वंचित ठेवले जात असल्याचा आरोप करण्यात आला असून, अन्न सुरक्षा योजनेच्या लाभार्थींना अन्न-धान्याचा लाभ मिळण्याची मागणी करण्यात आली आहे. अन्यथा 6 जून पासून जिल्हाधिकारी कार्यालया समोर उपोषण करण्याचा इशारा देण्यात आला आहे.