• Sun. Jun 28th, 2026

Mirrornews24

Marathi News

राष्ट्रीय पल्स पोलिओ मोहिमेला शहरात उत्स्फूर्त प्रतिसाद

ByMirror

Jun 28, 2026
28 केंद्रांवर लसीकरण, रेल्वे स्थानकावरही प्रवासी बालकांना डोस

भोसले आखाडा येथील बालकांना पोलिओचे डोस; महानगरपालिकेच्या जिजामाता नागरी आरोग्य केंद्र व जायंट्‌स ग्रुपचा संयुक्त उपक्रम;


28 केंद्रांवर लसीकरण, रेल्वे स्थानकावरही प्रवासी बालकांना डोस


अहिल्यानगर (प्रतिनिधी)- बालकांना पोलिओसारख्या गंभीर आजारापासून सुरक्षित ठेवण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या राष्ट्रीय पल्स पोलिओ मोहिमेअंतर्गत रविवारी (दि. 28 जून) अहिल्यानगर महानगरपालिका, जिजामाता नागरी आरोग्य केंद्र आणि जायंट्‌स ग्रुप ऑफ अहिल्यानगर यांच्या संयुक्त विद्यमाने भोसले आखाडा येथे विशेष लसीकरण शिबिराचे आयोजन करण्यात आले. या मोहिमेला परिसरातील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. याशिवाय रेल्वे स्थानकावर जाऊन प्रवास करणाऱ्या बालकांनाही पोलिओचे डोस पाजण्यात आले.


या मोहिमेचा शुभारंभ माजी उपमहापौर गणेश भोसले यांच्या हस्ते झाला. यावेळी बोलताना त्यांनी सांगितले की, “पोलिओमुक्त महाराष्ट्र आणि पोलिओमुक्त भारत हे आपले सामूहिक स्वप्न आहे. प्रत्येक पालकाने आपल्या बालकाला पोलिओचे दोन थेंब देऊन या राष्ट्रीय मोहिमेत सहभाग नोंदवावा. नागरिकांच्या सहकार्यामुळेच देशाची पोलिओमुक्तीकडे वाटचाल अधिक वेगाने होऊ शकणार असल्याचा विश्‍वास त्यांनी व्यक्त केला.


कार्यक्रमास नगरसेवक प्रकाश भागानगरे, नगरसेविका सौ. सुनिताताई फुलसौंदर, मीनाताई चोपडा, जायंट्‌स वेल्फेअर फाऊंडेशन स्पेशल कमिटी सदस्य संजय गुगळे, जायंट्‌स ग्रुपचे अध्यक्ष राजेंद्र कटारिया, अभय मुथा, अनिल गांधी, वैद्यकीय अधिकारी डॉ. आयेशा शेख तसेच महानगरपालिकेचे आरोग्य अधिकारी डॉ. सतीश राजुरकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

भोसले आखाडा परिसरातील नागरिकांनी आपल्या लहान बालकांना मोठ्या उत्साहाने पोलिओचे डोस पाजले. जिजामाता नागरी आरोग्य केंद्राच्या कार्यक्षेत्रातील सुमारे 28 केंद्रांवर लसीकरणाची व्यवस्था करण्यात आली होती. कोणतेही बालक लसीकरणापासून वंचित राहू नये, यासाठी आरोग्य विभागाने विशेष नियोजन केले होते.


या मोहिमेत जायंट्‌स ग्रुप ऑफ अहिल्यानगरने जनजागृतीसाठी विशेष उपक्रम राबविले. कार्यक्रमस्थळी आकर्षक सेल्फी पॉइंट उभारण्यात आला होता. लहान मुलांसाठी आरोग्य केंद्रात टीव्हीची व्यवस्था, रंगीबेरंगी सजावट आणि आनंददायी वातावरण निर्माण करण्यात आले होते. तसेच लसीकरणानंतर सर्व बालकांना चॉकलेटचे वाटप करून त्यांचा उत्साह वाढविण्यात आला.
जायंट्‌स ग्रुपचे अध्यक्ष राजेंद्र कटारिया म्हणाले, “आजची लहान मुले ही उद्याच्या भारताची सक्षम पिढी आहे. त्यांच्या निरोगी भविष्यासाठी पोलिओ प्रतिबंधक लसीकरण अत्यंत आवश्‍यक आहे. समाजाप्रती असलेल्या बांधिलकीतून जायंट्‌स ग्रुप या मोहिमेत सक्रिय योगदान देत आहे आणि यापुढेही अशाच आरोग्यविषयक उपक्रमांमध्ये सहभागी राहील.”


जायंट्‌स वेल्फेअर फाऊंडेशनचे स्पेशल कमिटी सदस्य संजय गुगळे यांनी सांगितले की, “गेली चार दशके जायंट्‌स ग्रुप शहरात विविध सामाजिक, आरोग्यविषयक आणि जनकल्याणकारी उपक्रम सातत्याने राबवत आहे. पोलिओमुक्त भारताचे स्वप्न साकार करण्यासाठी प्रत्येक नागरिकाने आपल्या परिसरातील प्रत्येक बालकाला लसीकरण मिळेल याची काळजी घेणे आवश्‍यक आहे. ही मोहीम केवळ आरोग्य विभागाची नसून संपूर्ण समाजाची जबाबदारी असल्याचे सांगितले. या मोहिमेच्या यशस्वी आयोजनासाठी सर्व अंगणवाडी सेविका, आशा सेविका, प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचारी तसेच जायंट्‌स ग्रुपच्या सौ. नूतन गुगळे यांनी विशेष परिश्रम घेतले.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *