शिक्षक सेनेचे जिल्हाध्यक्ष प्रसाद शिंदे यांनी वेधले लक्ष; खासदार शिंदे यांचे पाठपुराव्याचे आश्वासन
प्रशासकीय अडचणी, अशैक्षणिक कामांचा ताण आणि प्रलंबित प्रश्नांवर चर्चा
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- जिल्ह्यातील शिक्षकांच्या विविध प्रलंबित प्रश्नांना न्याय मिळवून देण्यासाठी शिक्षक सेना, अहिल्यानगरच्या वतीने खासदार श्रीकांत एकनाथ शिंदे यांची भेट घेण्यात आली. शिक्षक सेनेचे जिल्हाध्यक्ष प्रसाद शिंदे यांनी खासदार शिंदे यांचे शनिशिंगणापूर येथे स्वागत करून शिक्षकांच्या विविध समस्या, प्रलंबित मागण्या आणि शिक्षण क्षेत्राशी संबंधित महत्त्वाच्या विषयांवर सविस्तर चर्चा केली.
या भेटीदरम्यान जिल्ह्यातील प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षकांना भेडसावणाऱ्या विविध प्रशासकीय अडचणी खासदारांच्या निदर्शनास आणून देण्यात आल्या. शिक्षकांकडून शैक्षणिक कामांव्यतिरिक्त सातत्याने विविध अशैक्षणिक जबाबदाऱ्या सोपविल्या जात असल्याने विद्यार्थ्यांच्या अध्यापनावर परिणाम होत असल्याची बाब शिक्षक सेनेच्या वतीने मांडण्यात आली. शिक्षकांना केवळ अध्यापन आणि विद्यार्थ्यांच्या गुणवत्तावाढीवर लक्ष केंद्रित करता यावे, यासाठी अशैक्षणिक कामांचा भार कमी करण्याची आवश्यकता अधोरेखित करण्यात आली.
याशिवाय शिक्षकांच्या विविध प्रलंबित मागण्या, सेवाविषयक अडचणी, पदोन्नती, वेतनाशी संबंधित प्रश्न, रिक्त पदे भरण्याची गरज तसेच शिक्षण व्यवस्थेची गुणवत्ता उंचावण्यासाठी आवश्यक उपाययोजनांबाबतही सविस्तर चर्चा झाली. विद्यार्थ्यांना दर्जेदार आणि गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळण्यासाठी शिक्षकांना आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याबाबतही यावेळी आग्रह धरण्यात आला.
खासदार श्रीकांत शिंदे यांनी शिक्षकांच्या समस्या गांभीर्याने ऐकून घेत सकारात्मक भूमिका व्यक्त केली. शिक्षकांनी मांडलेल्या न्याय्य मागण्यांबाबत संबंधित विभागाशी पाठपुरावा करून त्या मार्गी लावण्यासाठी आवश्यक ते प्रयत्न करण्यात येतील, तसेच शिक्षण क्षेत्राशी संबंधित विषय शासन स्तरावर प्रभावीपणे मांडले जातील, असे आश्वासन त्यांनी दिले.
यावेळी शिक्षक सेनेचे जिल्हाध्यक्ष प्रसाद शिंदे यांनी सांगितले की, शिक्षकांच्या हक्कांसाठी आणि त्यांच्या विविध प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी शिक्षक सेना सातत्याने प्रयत्नशील आहे. जिल्ह्यातील प्रत्येक शिक्षकाच्या समस्या शासनापर्यंत पोहोचवून त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी संघटना कटिबद्ध असून, भविष्यातही शिक्षकांच्या हितासाठी संघर्ष आणि पाठपुरावा सुरूच राहणार आहे, असा निर्धार त्यांनी व्यक्त केला.

