• Fri. Jul 3rd, 2026

Mirrornews24

Marathi News

खंडणीखोरांपासून कंपनीच्या संरक्षणासाठी शिवसेनेचा पुढाकार

ByMirror

Aug 11, 2025
दहशत पसरवणाऱ्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी

एक्साइड कंपनी व्यवस्थापनाबरोबर बैठक घेऊन दिली संरक्षणाची हमी


दहशत पसरवणाऱ्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी

ही प्रवृत्ती थांबवली नाही तर उरलेले उद्योग देखील शहर सोडतील -अनिल शिंदे

नगर (प्रतिनिधी)- एमआयडीसीतील एक्साइड इंडस्ट्रीज कंपनीच्या कच्च्या मालाच्या गाड्या अडवून दहशत माजविणाऱ्या गुंड प्रवृत्तीचा बंदोबस्त करण्यासाठी शिवसेनेने पुढाकार घेतला आहे. शिवसेनेच्या वतीने नुकतीच कंपनी प्रशासनाबरोबर बैठक घेऊन त्यांना संपूर्ण संरक्षण देण्याचे जाहीर करण्यात आले. यावेळी नगर शहरातील उद्योग व कामगारांचे रोजगार वाचवण्यासाठी शिवसेना ठामपणे उद्योजकांच्या पाठीशी उभी राहणार असल्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.


बैठकीला एक्साइड इंडस्ट्रीज कंपनीचे विभाग प्रमुख संदीप मुनोत, शिवसेना जिल्हाप्रमुख अनिल शिंदे, दिलीप सातपुते, संभाजी कदम, माजी नगरसेवक बाळासाहेब बोराटे, संतोष ग्यानाप्पा, सचिन शिंदे, रणजीत परदेशी, युवासेना जिल्हाप्रमुख योगेश गलांडे, स्वराज्य कामगार संघटनेचे अध्यक्ष दत्ता तापकिरे, सहसेक्रेटरी सुनिल कदम, कामगार प्रतिनिधी अजिनाथ शिरसाट, प्रदीप दहातोंडे, वसीम शेख, दिपक परभाणे, अभिजीत सांबारे, संतोष शेवाळे, जितेंद्र तळेकर, शशिकांत संसारे, राम घुगे, नामदेव झेंडे आदी उपस्थित होते.


एमआयडीसी परिसरातील एक्साइड कंपनीत नगर व आसपासच्या भागातील तब्बल 3,000 हून अधिक कामगार कार्यरत आहेत. कंपनीसाठी लागणारा कच्चा माल नाशिक, पुणे आदी ठिकाणांहून आणला जातो. अलीकडेच आकाश बबन दंडवते यांच्या टोळीने खंडणीच्या हेतूने बाहेरील कच्चा माल घेऊन येणाऱ्या गाड्यांना अडवून चालकांना शिवीगाळ व धमक्या दिल्या. यामुळे उद्योगात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. शिवसेनेच्या नेत्यांनी या गुंड प्रवृत्तीचा वेळीच बंदोबस्त न केल्यास कंपनी बंद पडण्याचा, आणि त्यामुळे हजारो कामगारांचा रोजगार धोक्यात येण्याचा इशारा दिला.


अनिल शिंदे म्हणाले की, खंडणीखोर वृत्तीमुळे अनेक उद्योजक नगर शहर सोडून गेले आहेत. ही प्रवृत्ती थांबवली नाही तर उरलेले उद्योग देखील शहर सोडतील, आणि हजारो युवक बेरोजगार होतील. शिवसेना उद्योग व रोजगार वाचवण्यासाठी रस्त्यावर उतरेल. आकाश दंडवते व त्याच्या टोळीचा बंदोबस्त करण्यासाठी आम्ही जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षकांना भेटणार असल्याचे स्पष्ट केले.


योगेश गलांडे म्हणाले की, आकाश दंडवतेवर खंडणीचा गुन्हा दाखल झाल्यामुळे सुडबुध्दीने माझ्यावर खोटा गुन्हा दखल करण्यात आला. एका व्यक्तीला पुढे करून गुन्हा दाखल करण्यात आला असून, लवकरच उद्योगमंत्री उदय सामंत यांची भेट घेऊन एमआयडीसीमधील खंडणीखोरांविरोधात ठोस कारवाईची मागणी केली जाणार असल्याचे ते म्हणाले.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *