• Fri. Jul 3rd, 2026

Mirrornews24

Marathi News

विधान परिषदेच्या उपसभापतीपदी सचिन अहिर; अहिल्यानगरमध्ये अखिल भारतीय सेनेकडून स्वागत

ByMirror

Jul 3, 2026
‘योग्य, निर्भीड आणि अनुभवी नेतृत्वाला न्याय’ -आदिनाथ वनारसे

‘योग्य, निर्भीड आणि अनुभवी नेतृत्वाला न्याय’ -आदिनाथ वनारसे


अहिल्यानगर (प्रतिनिधी)- महाराष्ट्र विधान परिषदेच्या उपसभापतीपदी आमदार सचिन अहिर यांची एकमताने व बिनविरोध निवड झाल्याबद्दल अहिल्यानगर शहरात अखिल भारतीय सेना च्या वतीने आनंद व्यक्त करुन या निवडीचे स्वागत करण्यातआले आहे. संघटनेच्या बैठकीत त्यांच्या अभिनंदनाचा ठराव एकमताने मंजूर करण्यात आला असून, ही निवड राज्याच्या संसदीय लोकशाहीसाठी तसेच सक्षम नेतृत्वाला मिळालेला योग्य सन्मान असल्याची भावना संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली.


आमदार सचिन अहिर यांची चळवळीतून घडलेला कार्यकर्ता ही त्यांची खरी ओळख आहे. मिल मजदूर संघाच्या माध्यमातून त्यांनी कामगारांच्या प्रश्‍नांसाठी संघर्ष केला. त्यानंतर 1999 साली ते प्रथमच विधानसभेवर निवडून गेले. विविध मंत्रीपदे आणि संघटनात्मक जबाबदाऱ्या यशस्वीपणे सांभाळत त्यांनी राज्याच्या राजकारणात आपली स्वतंत्र छाप निर्माण केली आहे. त्यांच्या अनुभवाचा लाभ आता विधान परिषदेच्या कामकाजालाही होणार असल्याची भावना संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली.
अखिल भारतीय सेनेचे जिल्हाध्यक्ष आदिनाथ वनारसे यांनी सचिन अहिर यांचे अभिनंदन करताना सांगितले की, महाराष्ट्र विधान परिषदेच्या उपसभापतीपदासाठी योग्य, अभ्यासू, अनुभवी आणि निर्भीड नेतृत्वाची निवड झाली आहे. संसदीय कामकाजाचा अनुभव, सर्वपक्षीय समन्वयाची क्षमता आणि जनतेच्या प्रश्‍नांबाबतची संवेदनशीलता यामुळे सचिन अहिर हे या जबाबदारीसाठी सर्वार्थाने पात्र आहेत. त्यांच्या निवडीमुळे विधान परिषदेच्या कामकाजाला अधिक प्रभावी दिशा मिळेल, असा विश्‍वास त्यांनी व्यक्त केला.


वनारसे म्हणाले की, एकेकाळी माजी आमदार अरुण गवळी यांना शिवसेनेची रक्तवाहिनी म्हणून ओळखले जात होते. आजही गवळी यांचे राजकारण आणि समाजकारण जनसामान्यांच्या प्रश्‍नांशी जोडलेले आहे. त्यांचे भाचे असलेले शिवसेना नेते सचिन अहिर यांनीही जनआंदोलनातून आणि कार्यकर्त्यांच्या बळावर आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. त्यांच्या कार्यशैलीमध्ये गवळी यांच्या निर्भीड, स्पष्टवक्तेपणा आणि जनहिताच्या भूमिकेची झलक पाहायला मिळते. त्यामुळे राज्याच्या हिताचे निर्णय घेण्यासाठी ते उपसभापती म्हणून प्रभावी भूमिका बजावतील, असा विश्‍वास त्यांनी व्यक्त केला.


दरम्यान, शहरात आयोजित बैठकीत सचिन अहिर यांच्या अभिनंदनाचा ठराव मंजूर करण्यात आला. यावेळी ॲड. पवन कुमार, संतोष गुंदेचा, दीपक मेहेर, ॲड. किरण कुमार, भास्कर लवांडे, दीपक गाले, गणेश खोमणे, एकनाथ मीरपगार, नागेश खोमणे यांच्यासह अखिल भारतीय सेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. उपस्थितांनी सचिन अहिर यांच्या निवडीबद्दल आनंद व्यक्त करत त्यांच्या पुढील संसदीय वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *