गरजू विद्यार्थ्यांसाठी शिक्षणाचा आधारवड ठरलेले व शिक्षकांचे प्रश्न सोडविणाऱ्या अभ्यासू नेतृत्वाचा सन्मान
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- माध्यमिक शिक्षक सोसायटीचे संचालक व महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब बोडखे यांची भुईकोट किल्ला परिसरातील पंडित नेहरू हिंदी विद्यालयाच्या मुख्याध्यापकपदी पदोन्नती झाल्याबद्दल त्यांचा राज्याचे शिक्षण उपसंचालक डॉ. गणपतराव मोरे यांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला. शैक्षणिक क्षेत्रातील त्यांचे दीर्घकाळाचे योगदान, शिक्षक चळवळीतले नेतृत्व आणि समाजाभिमुख कार्याची दखल घेत हा गौरव करण्यात आला.
यावेळी माध्यमिक शिक्षण विभागाच्या शिक्षणाधिकारी संध्याताई गायकवाड, डॉ. चव्हाण, मुख्याध्यापक संघाचे जिल्हाध्यक्ष प्रा. सुनील पंडीत, माध्यमिक शिक्षक सोसायटीचे चेअरमन प्रा. आप्पासाहेब शिंदे, प्रा. दत्तापाटील नारळे, प्रा. रमजान हावलदार, प्रा. दिलीप काटे यांच्यासह शिक्षण क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते.
बाबासाहेब बोडखे यांनी शिक्षक संघटनेच्या माध्यमातून गेल्या अनेक वर्षांपासून शिक्षकांचे विविध प्रश्न शासन दरबारी प्रभावीपणे मांडून त्यांची सोडवणूक करण्यासाठी सातत्यपूर्ण प्रयत्न केले आहेत. शिक्षकांच्या न्याय्य हक्कांसाठी लढणारे, अभ्यासपूर्ण भूमिका मांडणारे आणि प्रशासनाशी समन्वय साधून प्रश्नांची उकल करणारे प्रभावी नेतृत्व म्हणून त्यांनी जिल्ह्यासह राज्यात स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे.
शिक्षक संघटनेतील कार्याबरोबरच त्यांनी सामाजिक बांधिलकीही जपली आहे. विशेषतः दिव्यांग, आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि गरजू विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी ते सातत्याने कार्यरत आहेत. दरवर्षी गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप, शैक्षणिक पालकत्व स्वीकारणे, विद्यार्थ्यांना सायकली उपलब्ध करून देणे अशा विविध उपक्रमांद्वारे त्यांनी अनेक विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला बळ दिले आहे. शिक्षण हेच समाजपरिवर्तनाचे प्रभावी माध्यम असल्याच्या भूमिकेतून ते सातत्याने कार्य करत आहेत. पंडित नेहरू हिंदी विद्यालयात शिक्षक म्हणून कार्यरत असताना त्यांनी शैक्षणिक गुणवत्तावाढीसाठी महत्त्वपूर्ण योगदान दिले. विशेषतः इतर राज्यांतून आलेल्या हिंदी भाषिक विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देऊन त्यांच्यात शैक्षणिक प्रगतीची प्रेरणा निर्माण करण्याचे कार्य त्यांनी प्रभावीपणे केले. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध उपक्रम राबवले.
बोडखे यांची सामाजिक जाणीव त्यांच्या कार्यातूनही अधोरेखित होते. त्यांनी स्वतः शिक्षण घेतलेल्या पारगाव मौला येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे पालकत्व स्वीकारले आहे. या शाळेच्या विकासासाठी त्यांनी स्वखर्चातून विद्यार्थ्यांसाठी खेळाचे मैदान तयार करून दिले. तसेच शाळेच्या परिसरात मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण करून त्या वृक्षांचे संगोपनही केले. दरवर्षी या शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून देत शिक्षणासाठी आवश्यक असलेला आधार देण्याचे कार्य ते सातत्याने करत आहेत. बोडखे यांच्या सर्वांगीन कार्याची दखल घेऊन त्यांची मुख्याधापकपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
या प्रसंगी शिक्षण उपसंचालक डॉ. गणपतराव मोरे यांनी बाबासाहेब बोडखे यांच्या शैक्षणिक, सामाजिक आणि संघटनात्मक कार्याचे विशेष कौतुक केले. शिक्षक, विद्यार्थी आणि समाज यांना केंद्रस्थानी ठेवून त्यांनी केलेले कार्य प्रेरणादायी असल्याचे सांगत, मुख्याध्यापक म्हणून त्यांच्या नव्या जबाबदारीसाठी शुभेच्छा व्यक्त केल्या.

