• Tue. Jul 14th, 2026

Mirrornews24

Marathi News

लष्करी संस्थालगत बांधकामसाठी अंतराची अट शिथिल करावी

ByMirror

Sep 1, 2023

शिवसेनेचे संपर्कप्रमुख सचिन जाधव यांचे संरक्षण मंत्री यांना निवेदन

भिंगार छावणी परिषदेतील विविध प्रश्‍नी वेधले लक्ष

अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरात असलेल्या लष्करी संस्थांजवळील बांधकामाचे अंतराची अट संरक्षण विभागाकडून शिथिल करण्याच्या मागणीसह भिंगार छावणी हद्दीतील विविध प्रश्‍नांचे निवेदन शिवसेनेचे संपर्कप्रमुख (दक्षिण) सचिन जाधव यांनी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांना दिले.


प्रवरानगर येथे आलेले संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची भेट घेऊन जाधव यांनी पश्‍चिमेकडे सीना नदीची पुररेषा तर पूर्वेला लष्कराची जमीन व संस्था असल्याने शहरातील नागरिकांना बांधकाम करण्यास मोठी अडचण येत असल्याबाबत लक्ष वेधले. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, शिवसेनेचे शहर प्रमुख दिलीप सातपुते, भाजपचे शहराध्यक्ष अभय आगरकर, शिवसेनेचे भिंगार शहर प्रमुख सुनिल लालबोंद्रे, नगरसेवक संजय छजलानी, रविंद्र लालबोंद्रे आदी उपस्थित होते.


लष्करी संस्थालगत एक मजली बांधकाम करावयाचे असेल तर 100 मीटर तर बहुमजली बांधकाम करावयाचे असेल तर 500 मीटर अंतराचा संरक्षण विभागाचा नियम आहे. शहराच्या विस्ताराला व पर्यायाने विकासालाही मार्यादा पडल्या आहेत. शहर व परिसरात लष्कराचे मोठे क्षेत्र आणि संस्था आहेत. या संस्थालगत नागरिकांच्या खासगी मालमत्ता आहेत. मात्र, कठोर नियमांमुळे नागरिकांना त्या जागांचा योग्य पद्धतीने विकास करता येेत नाही. त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. तसेच लष्कराच्या बनावट एनओसीचेही प्रकार नगर शहरात घडले आहेत. हे टाळण्यासाठी अंतराची अट संरक्षण विभागानेच शिथिल करावी. तसेच अहमदनगर महानगरपालिका हद्दीत प्रभाग क्रमांक दहामधील रामवाडी, कोठला, गोकुळवाडी, कौलारू कॅम्प हे शहरातील मध्यवर्ती भाग आहेत. या भागात 50 वर्षापासून लोकांचा रहिवास आहे. या भागात सर्वसामान्य, गोरगरीब लोक राहतात मोठ्या प्रमाणात झोपडपट्टी भाग आहे. परिसरातील जागा ही संरक्षण विभागाच्या अंतर्गत असलेल्या छावणी परिषदेची आहे. हे क्षेत्र महानगरपालिकेने हस्तांतरित करून घेण्याबाबत संरक्षण विभागाने परवानगी दिलेली आहे. याबाबत संरक्षण विभाग, राज्य सरकार व महानगरपालिका यांनी सर्व प्रशासकीय बाबी तातडीने पूर्ण करून घेत स्थानिक रहिवाशांना विना मोबदला अथवा नाममात्र दरात जागा नावावर करून देण्याचे निवेदनात म्हंटले आहे.


त्याचप्रमाणे भिंगार छावणीतील बेल्हेश्‍वर मंदिर, वीर गोगादेव महाराज मंदिर आहे. दोन्ही मंदिरे संरक्षण विभागाच्या अंतर्गत छावणी हद्दीत येतात. मंदिरात दर्शनासाठी मोठ्या संख्येने भाविक येत असतात. सुरक्षा व इतर कारणांमुळे हे मंदिर लष्करांकडून बंद ठेवले जाते. हे मंदिर कायम स्वरुपी दर्शनास उघडे करावे व छावणी परिषदेतील विविध प्रश्‍नांवर शिवसेनेच्या शिष्टमंडळाने संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचे लक्ष वेधले.


शहर व भिंगारच्या विकासाठी संरक्षण विभागाने याबाबत केंद्र व राज्य सरकारने तातडीने निर्णय घेऊन सर्वसामान्य नागरिकांना दिलासा देण्याची मागणी सचिन जाधव यांनी केली आहे.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *