साधकांचा उत्स्फूर्त सहभाग; आत्मचिंतन, अंतर्मन शुद्धी व समाधीचा दिव्य संगम
आत्मध्यानातून स्वत:ची खरी ओळख होते -डॉ. पू. श्री शिवमुनीजी
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- आचार्य प.पू. श्री आनंदऋषिजी म.सा. यांचे सुशिष्य तसेच महाराष्ट्र प्रवर्तक महाश्रमण पूज्य श्री कुंदनऋषिजी म.सा. यांच्या 92 व्या जन्मदिनानिमित्त आनंदधामच्या पावन भूमीवर रविवारी (दि. 9 नोव्हेंबर) “आत्मध्यान धर्मयज्ञ” हा भव्य आध्यात्मिक सोहळा उत्साहात पार पडला.
या प्रसंगी युगप्रधान, आचार्य सम्राट, ध्यानयोगी डॉ. पू. श्री शिवमुनीजी म.सा. यांच्या प्रेरणेत व मार्गदर्शनाखाली आनंदधाम येथे लाईव्ह आत्मध्यान साधना आयोजित करण्यात आली होती. देशभरातील साधक-साधिकांनी उदयपूर, पुणे, लुधियाना, भटिंडा नासिक, सूरत आदी ठिकाणांहून साधारण 1400 साधकांनी या ऑनलाइन साधनेत सहभाग घेतला. संपूर्ण परिसर ध्यानमय वातावरणाने भारला होता. प्रत्येक साधकाला अंतर्मनातील शांतता आणि समाधानाची अनुभूती यातून लाभली.
डॉ. पू. श्री शिवमुनीजी यांनी आपल्या प्रवचनातून साधकांना आत्मध्यानाचे महत्त्व स्पष्ट करताना सांगितले की, आत्मध्यान साधनेत प्रत्येक समस्येचे निराकरण सामावलेले आहे. आत्मध्यानातून ‘मी कोण आहे?’ या प्रश्नाचे उत्तर सापडते. ही साधना आपल्याला आत्मचिंतन आणि आत्मजागृतीकडे नेते.
त्यांनी पुढे सांगितले की, आत्मध्यान धर्मयज्ञ हा केवळ धार्मिक कार्यक्रम नसून, आत्मशुद्धी, संयम, समाधान आणि अध्यात्मिक उन्नतीचा दिव्य संगम आहे. या साधनेतून साधकाला अंतर्मनातील शांततेचा आणि समाधीचा अनुभव मिळत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. यावेळी साधिका निशाजी जैन यांनी अरिहंत वाणी तून आत्मबोध दिला. प्रमुख मंत्री प. पू. शिरीष मुनीजी महाराज यांनीही प्रबोधन करून साधकांना आध्यात्मिक मार्गावर दृढ राहण्याचे आवाहन केले.
या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी विनायक नगर जैन श्रावक संघाने पुढाकार घेतला. तसेच रमेशलाल चंदनमल गुंदेचा, विमल गुंदेचा परिवार, आनंद कटारिया परिवार, सचिन भळगट, सुरेशलाल मानकचंद कटारिया, विजयकुमार शांतीलाल गुंदेचा, डॉ. सपना गुगळे, मोना चोपडा, सौ. छाया मुथा, पारस गुंदेचा आदींनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाच्या अखेरीस साधक-साधिकांनी आत्मध्यानाच्या माध्यमातून साधलेला शांततेचा अनुभव व्यक्त केला.
