• Fri. Jul 17th, 2026

Mirrornews24

Marathi News

पीडित महिलेचे जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर उपोषण

ByMirror

Feb 14, 2026

प्रेमसंबंधातून शारीरिक शोषण

स्त्री अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्याची मागणी

अहिल्यानगर (प्रतिनिधी)- श्रीरामपूर तालुक्यातील एका पीडित महिलेने शिक्षकावर गंभीर स्वरूपाचे आरोप करत त्याच्याविरुद्ध तात्काळ गुन्हा दाखल करून अटक करण्याची मागणी केली आहे. संबंधित महिलेने दिलेल्या निवेदनानुसार, तिच्या असहाय्य परिस्थितीचा गैरफायदा घेत तब्बल 13 ते 14 वर्षे शारीरिक संबंध ठेवून फसवणूक व अत्याचार केल्याचा आरोप करण्यात आला आहे.


पीडित महिलेच्या म्हणण्यानुसार, पती कडून घटस्फोट मिळाल्यानंतर ती आर्थिक व सामाजिकदृष्ट्या असुरक्षित स्थितीत होती. त्या काळात ती वडाळा महादेव परिसरातील एका शाळेत सफाई कामगार म्हणून कार्यरत होती. त्यावेळी संबंधित शिक्षकाचे त्या शाळेत येणे-जाणे होते. ओळखीचे रूपांतर जवळकीत झाले आणि लग्नाचे आश्‍वासन देत आरोपीने तिच्याशी संबंध प्रस्थापित केल्याचा आरोप आहे.


महिलेने दिलेल्या माहितीनुसार, विविध ठिकाणी नेऊन तिच्या इच्छेविरुद्ध संबंध ठेवण्यात आले. श्रीरामपूर येथील एका लॉजमध्ये तसेच इतर धार्मिक व पर्यटनस्थळी नेऊन शारीरिक शोषण केल्याचे निवेदनात नमूद आहे. आरोपीने लग्न करण्याचे व मुलाचा सांभाळ करण्याचे आश्‍वासन दिल्याने आपण मौन बाळगल्याचेही तिने सांगितले.


पुढे आरोपीने भेटणे टाळले व धमक्या देण्यास सुरुवात केल्याचा आरोप आहे. महिलेच्या म्हणण्यानुसार, तिला आर्थिक मदत नाकारून उलट “तू काहीही करू शकत नाहीस” अशा शब्दांत धमकावण्यात आले. रात्री उशिरा येऊन मारहाण केल्याचे तसेच मुलालाही त्रास दिल्याचे आरोप करण्यात आले आहेत.


14 नोव्हेंबर 2025 रोजी आरोपीच्या घरी जाब विचारण्यासाठी गेल्यानंतर आरोपी व त्याच्या कुटुंबीयांनी दगड व काठीने मारहाण केल्याचा आरोपही महिलेने केला आहे. या घटनेनंतर तिने श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन येथे 15 व 18 नोव्हेंबर 2025 रोजी तक्रार दाखल केली. मात्र कोणतीही ठोस कारवाई झाली नसल्याचा आरोप तिने केला आहे.


उलट संबंधित व्यक्तीनेच आपल्या विरोधात खंडणी मागितल्याची खोटी तक्रार दाखल केल्याचेही महिलेने निवेदनात म्हटले आहे. या सर्व प्रकरणाची सखोल चौकशी करून स्त्री अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करून आरोपीस तात्काळ अटक करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *