• Fri. Jul 17th, 2026

Mirrornews24

Marathi News

महाशिवरात्री निमित्त श्री आनंदेश्‍वर मंदिरात भक्तिमय पारायण सोहळ्याची सुरुवात

ByMirror

Feb 13, 2026
‘ॐ नमः शिवाय’ जपाने दुमदुमला परिसर; रविवारी अभिषेक व प्रसाद वाटप

‘ॐ नमः शिवाय’ जपाने दुमदुमला परिसर; रविवारी अभिषेक व प्रसाद वाटप

अहिल्यानगर (प्रतिनिधी)- महाशिवरात्रीच्या पवित्र पर्वाच्या पार्श्‍वभूमीवर स्टेशन रोड येथील स्वामी अपार्टमेंटसमोरील श्री आनंदेश्‍वर महादेव व दत्त मंदिर परिसरात सध्या भक्तिमय वातावरण निर्माण झाले आहे. आदिशक्ती सार्वजनिक मित्र व महिला मंडळाच्या वतीने येथे ‘शिवलीलामृत’ पारायण सोहळा आणि ‘ॐ नमः शिवाय’ जप सुरू असून, या धार्मिक उपक्रमामुळे संपूर्ण परिसर भक्तीमय झाले आहे.


महाशिवरात्री निमित्त आयोजित या पारायण सोहळ्यास महिला, युवक आणि ज्येष्ठ नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. दररोज सकाळ-संध्याकाळ महिला मंदिरात एकत्र येऊन ‘ॐ नमः शिवाय’चा सामूहिक जप करत आहेत. शिवलीलामृताचे पारायण भक्तिभावाने सुरू असून, भगवान शंकराच्या महिम्याचे गोड स्वरांतील पठण परिसराला आध्यात्मिक स्पर्श देत आहे.
मंदिर परिसराची आकर्षक सजावट करण्यात आली असून, या भक्तीमय सोहळ्याने वातावरण अधिकच मंगलमय झाले आहे. हा पारायण सोहळा महाशिवरात्रीच्या दिवशी रविवारी (दि. 15 फेब्रुवारी) समाप्त होणार आहे. त्या दिवशी सकाळी 6 वाजता भगवान शिवची विधिवत अभिषेक पूजा करण्यात येणार आहे. त्यानंतर सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत भाविकांसाठी महाप्रसादाचे वाटप करण्यात येणार आहे.


आदिशक्ती सार्वजनिक मित्र व महिला मंडळाच्या वतीने सर्व शिवभक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून अभिषेक व प्रसादाचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *