• Sat. Feb 8th, 2025

शहरात स्व. बाळासाहेब ठाकरे यांची जयंती भगवा सप्ताहाने होणार साजरी

ByMirror

Jan 21, 2025

शिवसेनेच्या वतीने सात दिवस विविध सामाजिक उपक्रमाचे आयोजन

उपेक्षित, गरजूंसह सर्वसामान्यांना आधार देण्यासाठी पुढाकार

नगर (प्रतिनिधी)- शहरात शिवसेनेच्या वतीने शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांची जयंती भगवा सप्ताह म्हणून साजरी केली जाणार आहे. या पार्श्‍वभूमीवर मंगलगेट येथील शिवसेनेच्या शहर संपर्क कार्यालयात नियोजन बैठक पार पडली. या सप्ताहाचे प्रारंभ गुरुवारी (दि.23 जानेवारी) स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती दिनी होणार असून, सात दिवसात दररोज दोन सामाजिक उपक्रमांचे नियोजन करण्यात आले आहे.


या बैठकीप्रसंगी जिल्हाप्रमुख अनिल शिंदे, बाबुशेठ टायरवाले, शहर प्रमुख सचिन जाधव, जिल्हा संपर्कप्रमुख दिलीप सातपुते, भिंगार शहर प्रमुख सुनिल लालबोंद्रे, माजी नगरसेवक दिपक खैरे, अनिल लोखंडे, प्रशांत गायकवाड, दत्ता जाधव, युवा सेना जिल्हाप्रमुख योगेश गलांडे, शहर प्रमुख महेश लोंढे, अभिषेक भोसले, अमोल हुंबे, दिगंबर गेंट्याल, काका शेळके, प्रा. विशाल शितोळे, आनंद वाळके, सुनिल भिंगारदिवे, रविंद्र लालबोंद्रे, विजय चव्हाण, शोभना चव्हाण, महिला आघाडीच्या शहर प्रमुख पुष्पाताई येळवंडे, तृप्ती साळवे, सलोनी शिंदे, शोभना चव्हाण, अंगद महानवर, आशिष शिंदे, भारत कांडेकर, हनिफ शेख, अविनाश भिंगारदिवे आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.


अनिल शिंदे म्हणाले की, जाहिरातबाजी करण्यापेक्षा शिवसैनिक सामाजिक कार्याने स्व. बाळासाहेब ठाकरे यांची जयंती साजरी करणार आहे. सर्वसामान्यांना आधार देण्याच्या उद्देशाने सामाजिक उपक्रमाचे नियोजन करण्यात आले आहे. बाळासाहेबांनी दिलेला समाजकारणाचा वैचारिक वारसा पुढे घेऊन जाण्याचे कार्य शिवसैनिक करत आहे. या संपूर्ण सप्ताहात विविध कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.


सचिन जाधव म्हणाले की, पूर्वीच्या शिवसेनेने स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराला तडा दिल्याने राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेनेची वाटचाल सुरु आहे. स्व. बाळासाहेबांचे विचार सर्वसामान्यांपर्यंत पोहचविण्याचे कार्य केले जात आहे. वंचित, उपेक्षित, कष्टकरी व दुर्लक्षीत घटकांचे प्रश्‍न सोडविण्याचे काम शिवसेना करत आहे. शहरात साजरा होणारा भगवा सप्ताह सर्वसामान्यांना आधार देणारा ठरणार असल्याचे त्यांनी सांगितले.


दिलीप सातपुते यांनी सामाजिक उपक्रमांनी स्व. बाळासाहेब ठाकरे यांची जयंती साजरी होत असताना, विविध ठिकाणी शाखा उद्घाटन केले जाणार आहे. या जयंतीच्या माध्यमातून संपूर्ण शहर भगवेमय होणार आहे. सर्वसामान्यांनी शिवसेनेच्या आरोग्य शिबिराचा लाभ घेण्याचे आवाहन त्यांनी केले.


स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीच्या भगवा सप्ताहनिमित्त पांजरपोळ गो शाळा येथे चारा वाटप, रिमांड होम, केडगाव येथील सावली संस्था, स्नेहालय, एमआयडीसी येथील मूकबधिर विद्यालय तसेच बेवारस मतीमंदाचा सांभाळ करणाऱ्या अरणगाव रोड येथील सावली प्रकल्पात फळ, अन्नधान्य व अल्पोपहाराचे वाटक केले जाणार आहे. तसेच नगर-कल्याण रोड व भिंगार येथे आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. संपूर्ण सात दिवस शिवसैनिकांच्या माध्यमातून विविध सामाजिक उपक्रम सुरु राहणार असल्याची माहिती शिवसेनेच्या वतीने देण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *