• Tue. Jul 7th, 2026

Mirrornews24

Marathi News

माध्यमिक शिक्षक सोसायटीची 83 वी वार्षिक सभा किरकोळ गोंधळ वगळता शांततेत

ByMirror

Jul 7, 2026
8 टक्के लाभांश उद्याच सभासदांच्या खात्यात जमा

8 टक्के लाभांश उद्याच सभासदांच्या खात्यात जमा


थकबाकीदारांची नावे तालुकानिहाय जाहीर करणार; नामांतर, व्याजदर आणि ऑडिटवर रंगली जोरदार चर्चा


अहिल्यानगर (प्रतिनिधी)- जिल्ह्यातील सुमारे 11 हजार शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी सभासदांची आर्थिक आधारवड असलेल्या अहमदनगर जिल्हा माध्यमिक शिक्षक सहकारी सोसायटीची 83 वी वार्षिक सर्वसाधारण सभा रविवारी (दि. 5 जुलै) बुरुडगाव रोड येथील नक्षत्र लॉनमध्ये किरकोळ गोंधळ वगळता शांततेत पार पडली. तब्बल 22 वर्षांनंतर सत्तेवर आलेल्या स्वाभिमानी परिवर्तन मंडळाच्या कारकिर्दीतील ही दुसरी वार्षिक सभा ठरली. सभेत सोसायटीचे नामांतर, ठेवी व कर्जावरील व्याजदर, लाभांश, ऑडिटमधील तफावत आणि थकबाकी वसुली या विषयांवर जोरदार चर्चा झाली.


यावेळी चेअरमन आप्पासाहेब शिंदे यांनी ऑडिटमध्ये तब्बल 15 कोटी रुपयांची तफावत आढळून आल्याचा गंभीर खुलासा करत हा प्रकार मागील संचालक मंडळाच्या कार्यकाळातील असल्याचा दावा केला. या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा त्यांनी दिला. तसेच थकीत कर्ज वसुलीसाठी प्रत्येक तालुक्यातील संबंधित संस्थांमध्ये थकबाकीदारांची नावे फलकावर प्रसिद्ध करण्याचा निर्णयही संचालक मंडळाने घेतल्याची घोषणा करण्यात आली.
सोसायटीचे चेअरमन आप्पासाहेब शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सभेला व्हाईस चेअरमन अर्जुन वाळके, संचालक बाबासाहेब बोडखे, महेंद्र हिंगे, सुनील दानवे, उमेश गुंजाळ, राजेंद्र कोतकर, सुधीर कानवडे, संभाजी गाडे, किशोर धुमाळ, आप्पासाहेब जगताप, बालाजी गायकवाड, छबू फुंदे, साहेबराव रकटे, शिवाजी लवांडे, बाजीराव अनभुले, अतुल कोताडे, विजय पठारे, सुरज घाटविसावे, वर्षा खिलारी, वैशाली दारकुंडे, उद्धव सोनवणे, सचिन जाधव, सचिव स्वप्निल इथापे यांच्यासह माजी पदाधिकारी, संचालक आणि मोठ्या संख्येने सभासद उपस्थित होते.


सभेच्या प्रारंभी जिल्हा सहकारी मंडळाचे आर. पी. बचाटे यांनी सहकार कायदे, नियमावली, वार्षिक सभेचे महत्त्व व सहकार क्षेत्रातील विविध तरतुदींवर मार्गदर्शन केले. त्यानंतर राष्ट्रगीत, सरस्वती पूजन व दिवंगत सभासद, शहीद जवान तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांना श्रद्धांजली अर्पण करून सभेला प्रारंभ झाला. बाबासाहेब बोडखे यांनी अध्यक्षपदासाठी आप्पासाहेब शिंदे यांच्या नावाची सूचना मांडली, तर सुनील दानवे यांनी अनुमोदन दिले.


प्रास्ताविकात चेअरमन आप्पासाहेब शिंदे यांनी संचालक मंडळाने सभासदांच्या हिताला सर्वोच्च प्राधान्य देत अत्यंत काटकसरीने कारभार केल्याचे सांगितले. जिल्हा बँकेकडून 12.50 टक्के व्याजदराने कॅश क्रेडिट घेत असतानाही सभासदांना केवळ 7 टक्के दराने कर्जपुरवठा करण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले. संस्थेने अहवाल वर्षात 974 कोटी 29 लाख रुपयांचे कर्जवाटप केले असून त्यातून 56 कोटी 72 लाख रुपयांचा ढोबळ नफा, तर सर्व तरतुदी केल्यानंतर 13 कोटी 34 लाख रुपयांचा निव्वळ नफा झाल्याची माहिती त्यांनी दिली. यावर्षी 8 टक्के लाभांश मंजूर करण्यात आला असून सुमारे 9 कोटी 97 लाख रुपये सभासदांच्या खात्यावर जमा करण्यात येणार असल्याचेही त्यांनी जाहीर केले.


अहवाल वर्षात मयत निधीतून 43 दिवंगत सभासदांचे 4 कोटी 46 लाख रुपयांचे कर्ज माफ करण्यात आले. तसेच त्यांच्या वारसांना 2 कोटी 33 लाख रुपये परत करण्यात आले. कन्यादान/भाग्यलक्ष्मी योजनेंतर्गत 542 सभासदांना 81 लाख 30 हजार रुपयांची मदत त्यांच्या मुला-मुलींच्या विवाहप्रसंगी देण्यात आल्याची माहितीही शिंदे यांनी दिली. संचालक मंडळाने ठेवीवरील व्याजदर 6.50 टयांवरून 7 टक्के केल्यामुळे ठेवींमध्ये मोठी वाढ झाल्याचे त्यांनी सांगितले. खर्चात काटकसर करून मोठी बचत करण्यात आली असून 25 वर्षांनंतर दोन्ही ऑडिटरशी पत्रव्यवहार करून यंदा ऑडिट फीमध्ये तब्बल 9 लाख रुपयांची सवलत मिळविण्यात यश आल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. सभासदांच्या मुला-मुलींसाठी शहरात वसतिगृह उभारण्याच्या उद्देशाने महापालिकेकडे जागेची मागणी करण्यात आली असून, त्यासाठी पाठपुरावा सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.


सभेतील सर्वाधिक चर्चेचा विषय ठरला तो ऑडिट अहवाल. ऑडिटरने ऑफलाईन आणि ऑनलाईन नोंदींमध्ये मोठी विसंगती आढळून आल्याचे निदर्शनास आणून दिले असून सुमारे 15 कोटी रुपयांची तफावत असल्याचे सांगितले आहे. ही तफावत पूर्वीच्या कार्यकाळातील असल्याचा दावा करत नवीन संचालक मंडळ याची जबाबदारी स्वीकारणार नाही. या प्रकरणातील दोषींवर चौकशी करून कायदेशीर कारवाई केली जाईल, असा स्पष्ट इशारा चेअरमन शिंदे यांनी दिला.
सचिव स्वप्निल इथापे यांनी मागील सभेचे इतिवृत्त वाचून कायम केले तसेच वार्षिक अहवाल मंजूर करण्यात आला. सभासद संतोष कानडे यांनी मागील वर्षी मंजूर झालेल्या ‘अहिल्यानगर जिल्हा माध्यमिक शिक्षक, शिक्षकेतर सहकारी सोसायटी’ या नामांतराच्या ठरावाची अंमलबजावणी न झाल्याबद्दल नाराजी व्यक्त केली. यावर चेअरमन शिंदे यांनी प्रथम ‘अहिल्यानगर’ हे नाव अधिकृतरीत्या स्वीकारावे लागेल, त्यानंतर पुढील नामांतराची प्रक्रिया पूर्ण होईल, असे स्पष्ट केले. वैभव सांगळे यांनीही नामांतराचा मुद्दा उपस्थित केला.


सौ. भांगरे यांनी कर्ज वितरणाच्या प्रक्रियेवर नाराजी व्यक्त केली. त्यावर संचालक मंडळाने सेवा कालावधी अत्यल्प उरलेल्या सभासदांना नियमांनुसार कर्ज देता येत नसल्याचे स्पष्ट केले. रमजान हवालदार यांनी नवीन संचालक मंडळाच्या पारदर्शक व उत्तम कारभाराबद्दल अभिनंदनाचा ठराव मांडला. सभागृहाने टाळ्यांच्या कडकडाटात त्याला मंजुरी दिली.
संचालक बाबासाहेब बोडखे यांनी संस्थेत कोणत्याही परिस्थितीत नियमबाह्य कर्ज दिले जाणार नसल्याचे स्पष्ट केले. जुनी थकबाकी वसूल करण्यासाठी प्रत्येक तालुक्यातील संस्थांमध्ये थकबाकीदारांची नावे असलेले फलक लावण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. राज गवांदे यांनी संस्थेत कोट्यवधी रुपयांची तफावत निर्माण झाल्याने संबंधितांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणी केली. त्यावर चेअरमन शिंदे यांनी दोषींना कोणत्याही परिस्थितीत पाठीशी घातले जाणार नाही आणि गुन्हे दाखल करण्यास संचालक मंडळ मागे हटणार नसल्याचे स्पष्ट केले.


सभेदरम्यान दारूच्या नशेत व्यासपीठावर आलेल्या एका सभासदाला बाहेर काढण्यात आले. तसेच प्रश्‍न विचारण्यासाठी अनेक सभासद एकाचवेळी व्यासपीठाकडे आल्याने काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. चेअरमन शिंदे यांनी सर्व प्रश्‍नांना क्रमाने उत्तरे दिली जातील, असे सांगून परिस्थिती नियंत्रणात आणली. काही सभासदांनी थकबाकीदारांची नावे वार्षिक अहवालात प्रसिद्ध करण्याची सूचना केली. संतोष कानडे यांनी लाभांश कमी मिळाल्याबद्दल नाराजी व्यक्त केली. रामदास जंजीरे यांनी एनपीएसाठी 30 लाख रुपयांची कर्जवसुली करण्याची मागणी केली, तर चांगदेव खेमर यांनी ऑडिट फीचा मुद्दा उपस्थित केला.
सभेदरम्यान काही काळ वीजपुरवठा खंडित झाला. त्यानंतर सभेतील सर्व विषय मंजूर झाल्याची घोषणा करण्यात आली आणि सभेचा समारोप झाला. यावेळी माजी संचालक बाळासाहेब राजळे, सुरेश मिसाळ, ज्ञानेश्‍वर काळे, बाळासाहेब सोनवणे, कल्याण ठोंबरे, सत्यवान थोरे, कैलास रहाणे, चांगदेव खेमनर, ज्येष्ठ सभासद सुनिल पंडित, मिथून डोफ्लगरे आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुधीर कानवडे यांनी केले.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *