जिल्हाधिकारी कार्यालय येथे आढावा बैठक
तर शेवगावला ना. आठवले यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे भूमिपूजन
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- केंद्रीय मंत्री रामदास आठवले मंगळवारी (दि.7 जुलै) अहिल्यानगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहे. दुपारी 2 वाजता शहरातील शासकीय विश्रामगृह येथे पत्रकार परिषद होणार आहे. तसेच यानंतर जिल्हाधिकारी कार्यालय येथील सभागृहात जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक व विविध खात्यातील प्रमुख अधिकाऱ्यांसह आढावा बैठक होणार आहे. या बैठकीनंतर ते शेवगाव येथील कार्यक्रमाला रवाना होणार असल्याची माहिती रिपब्लिकन पक्षाचे दक्षिण जिल्हाध्यक्ष सुनिल साळवे यांनी दिली.
शेवगाव येथे 4 वाजता भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नियोजित पूर्णाकृती पुतळा व सुशोभीकरण कामाचे भूमिपूजन ना. आठवले यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी आयोजित करण्यात आलेल्या संकल्प मेळाव्यात रिपब्लिकन पक्ष नगर दक्षिणच्या वतीने ना. आठवले यांची केंद्रात राज्य मंत्रीपद तिसऱ्यांदा निवड झाल्याबद्दल व राज्यसभा सदस्यपदी तिसऱ्यांदा नियुक्ती झाल्याबद्दल नागरी सत्कार केला जाणार आहे. तसेच या मेळाव्यात नगर दक्षिण मधील मोठ्या संख्येने कार्यकर्ते रिपब्लिकन पक्षात प्रवेश करणार आहेत. या कार्यक्रमाची पूर्ण तयारी झाल्याची माहिती देखील जिल्हाध्यक्ष साळवे यांनी दिली आहे.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व तालुकाध्यक्ष जिल्हा कमिटी व राज्याचे प्रमुख नेते यांच्या मार्गदर्शनाखाली नियोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमासाठी माजी खासदार सुजय विखे पाटील, आजी-माजी मंत्री, आमदार यांच्यासह अविनाश मातेकर, राज्याचे अध्यक्ष राजा सरवदे, राष्ट्रीय युवा नेते जीत रामदास आठवले, राष्ट्रीय उपाध्यक्ष काकासाहेब खंबाळकर, राष्ट्रीय सचिव विनोद निकाळजे, राष्ट्रीय कार्याध्यक्ष कांतीकुमार जैन, प्रदेश सरचिटणीस गौतम भाऊ सोनवणे, प्रदेश कार्याध्यक्ष बाबुराव कदम, युवक प्रदेशाध्यक्ष पप्पू कागदे, राज्याचे उपाध्यक्ष तथा संपर्कप्रमुख श्रीकांत भालेराव, राज्य उपाध्यक्ष विजय वाकचौरे, ज्येष्ठ नेते अशोक गायकवाड, उत्तर जिल्हाध्यक्ष सुरेंद्र थोरात, राजा कापसे, लॉरेन्स स्वामी, मुंबई अध्यक्ष संजय डोळसे, भीमराज बागुल, रमेश गायकवाड, किरण दाभाडे आदींसह अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत. आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते, रिपब्लिकन पक्षातील आजी-माजी पदाधिकारी व कार्यकर्त्यांना मेळाव्याला मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन जिल्हाध्यक्ष तथा निमंत्रक सुनील साळवे व स्वागत अध्यक्ष तालुकाध्यक्ष सतीश मगर यांनी केले आहे.

