शालेय परिसरात वृक्षारोपण करुन विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणाबद्दल जागृती
शिक्षणासोबतच पर्यावरण संवर्धनाची जाणीव विद्यार्थ्यांमध्ये निर्माण होणे काळाची गरज -नगराध्यक्ष ज्ञानेश्वर पाटील कोळसे
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- विद्यार्थ्यांचे उत्तम आरोग्य, दर्जेदार शिक्षण आणि पर्यावरण संवर्धन या त्रिसूत्रीचा संदेश देत उमेद सोशल फाउंडेशनच्या वतीने राहुरी येथील प्रगती विद्यालयात आरोग्य तपासणी शिबिर, शैक्षणिक साहित्य वाटप आणि वृक्षारोपणाचा उपक्रम राबविण्यात आला. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी समाजातील विविध घटकांनी एकत्र येण्याची गरज असल्याचा संदेश देऊन विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणाबद्दल जागृती निर्माण करण्यात आली.
हा कार्यक्रम श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाच्या प्रगती विद्यालयात शिवाजी प्रसारक मंडळाचे उपाध्यक्ष तथा राहुरी नगरपालिकेचे नगराध्यक्ष ज्ञानेश्वर पाटील कोळसे यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि डॉ. बाबुराव बापुजी तनपुरे सहकारी साखर कारखान्याचे संचालक जनार्दन पाटील गाडे यांच्या अध्यक्षतेखाली उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. यावेळी अनिल जाधव, उमेद सोशल फाउंडेशनचे अध्यक्ष अनिल साळवे, उपाध्यक्ष कुणाल तनपुरे, खजिनदार संजय निर्मल, राहुरी फॅक्टरी शाखेचे सल्लागार रणजित लहारे, विजय लोंढे, रवी साखरे, रवी सुरेकर, भाऊसाहेब मोरे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या प्रारंभी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते विद्यालयातील विद्यार्थ्यांना वह्या, शैक्षणिक साहित्य व आवश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले. त्यानंतर शालेय परिसरात वृक्षारोपण करून विद्यार्थ्यांना पर्यावरण संवर्धनाचे महत्त्व समजावून सांगण्यात आले. प्रत्येक विद्यार्थ्याने किमान एक तरी वृक्ष लावून त्याचे संगोपन करण्याचा संकल्प करावा, असे आवाहनही यावेळी करण्यात आले.
विद्यालयाचे मुख्याध्यापक बी. जे. जाधव यांनी प्रास्ताविकात शाळेच्या शैक्षणिक, सांस्कृतिक व सामाजिक उपक्रमांची माहिती दिली. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी उमेद सोशल फाउंडेशनने घेतलेल्या पुढाकाराचे त्यांनी मनापासून कौतुक केले. अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाविषयी प्रेरणा निर्माण होत असून सामाजिक संस्था आणि शैक्षणिक संस्था यांच्यातील समन्वय अधिक दृढ होत असल्याचे त्यांनी नमूद केले.
नगराध्यक्ष ज्ञानेश्वर पाटील कोळसे म्हणाले की, विद्यार्थी हे देशाचे भावी शिल्पकार आहेत. त्यांच्या आरोग्याची, शिक्षणाची आणि संस्कारांची जबाबदारी केवळ शाळेची नसून संपूर्ण समाजाची आहे. उमेद सोशल फाउंडेशनने सामाजिक उत्तरदायित्वाची जाणीव ठेवून विद्यार्थ्यांसाठी राबविलेला हा उपक्रम निश्चितच प्रेरणादायी आहे. शिक्षणासोबतच पर्यावरण संवर्धनाची जाणीव विद्यार्थ्यांमध्ये निर्माण होणे काळाची गरज आहे. प्रगती विद्यालयाचे जे काही प्रलंबित प्रश्न आहेत, ते संबंधित विभागांशी समन्वय साधून प्राधान्याने मार्गी लावण्यासाठी आपण सर्वतोपरी प्रयत्न करू. विद्यार्थ्यांना अधिक चांगल्या शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी नगरपालिका आणि संबंधित यंत्रणा सकारात्मक असल्याचेही त्यांनी सांगितले.
जनार्दन पाटील गाडे यांनी समाजातील सक्षम घटकांनी शिक्षण क्षेत्रासाठी पुढाकार घेणे ही काळाची गरज आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देणारे असे उपक्रम सातत्याने व्हायला हवेत. यामुळे विद्यार्थ्यांच्या विकासाला निश्चितच नवी दिशा मिळणार असल्याचे सांगितले.
उमेद सोशल फाउंडेशनचे अध्यक्ष अनिल साळवे म्हणाले की, उमेद सोशल फाउंडेशन केवळ मदतीपुरते मर्यादित नसून समाजामध्ये सकारात्मक परिवर्तन घडविण्याचा प्रयत्न करीत आहे. विद्यार्थ्यांचे आरोग्य, शिक्षण, पर्यावरण आणि सामाजिक जाणीवा या चार क्षेत्रांवर सातत्याने काम सुरु आहे. जिल्ह्यातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांपर्यंत शैक्षणिक साहित्य, आरोग्य सेवा आणि आवश्यक मदत पोहोचविण्याचा संकल्प घेऊन कार्य सुरु असल्याचे त्यांनी सांगितले.
या उपक्रमात आरोग्य अधिकारी बारगळ यांनी विद्यार्थ्यांची वैद्यकीय तपासणी करून आवश्यक मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांच्या आरोग्याबाबत योग्य सवयी अंगीकारण्याचे आवाहन त्यांनी केले. यावेळी कोळसे सर, देशमुख सर, जाधव सर, जगताप सर, मुसळे मॅडम, काटे मॅडम, राठोड मॅडम, देवरे मॅडम, साईभाई मॅडम, भाऊसाहेब पगारे, हरीश गाडे, गणेश इंगळे यांच्यासह शाळेतील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या उपक्रमाबद्दल श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष अरुण तनपुरे आणि जनरल सेक्रेटरी हर्ष तनपुरे यांनी उमेद सोशल फाउंडेशनचे अभिनंदन करून पुढील सामाजिक उपक्रमांसाठी शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अमित देशमुख यांनी केले, तर उपस्थितांचे आभार मानले.

