• Thu. Jun 25th, 2026

Mirrornews24

Marathi News

संविधान सन्मान महामेळाव्यात होणार रामदास आठवले यांचा गौरव

ByMirror

Aug 31, 2024
संविधान सन्मान महामेळाव्यात होणार रामदास आठवले यांचा गौरव

रिपाईच्या सर्व आजी-माजी पदाधिकारी व कार्यकर्त्यांना उपस्थित राहण्याचे आवाहन

अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरात सोमवारी (दि.2 सप्टेंबर) होणाऱ्या संविधान सन्मान महामेळाव्यात तिसऱ्यांदा केंद्रीय मंत्री मंडळात स्थान मिळवणारे रिपाईचे राष्ट्रीय अध्यक्ष ना. रामदास आठवले यांचा आंबेडकरी समाजाच्या वतीने गौरव केला जाणार असून, या मेळाव्यात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या सर्व आजी-माजी पदाधिकारी व कार्यकर्त्यांना उपस्थित राहण्याचे आवाहन प्रभारी जिल्हाध्यक्ष सुनिल साळवे यांनी केले आहे.


लोकसभेच्या निवडणुकीत विरोधी इंडिया आघाडीने (एनडीए) महायुती सरकार संविधान बदलणार असल्याचा अपप्रचार केला होता. तो केवळ जनतेची दिशाभूल करणारा स्टंट होता. त्यामुळे संविधानाच्या सन्मानार्थ शहरात जिल्हाव्यापी संविधान सन्मान मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. आमदार संग्राम जगताप यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या मेळाव्यात केंद्रीय मंत्री आठवले यांचा सन्मान होणार आहे. या कार्यक्रमासाठी रिपाईचे राज्य उपाध्यक्ष तथा जिल्हा संपर्क प्रमुख श्रीकांत भालेराव, राज्य उपाध्यक्ष विजय वाकचौरे, राज्य उपाध्यक्ष राजाभाऊ कापसे, राज्य सचिव भिमा बागुल, उत्तर जिल्हाध्यक्ष सुरेंद्र थोरात, जिल्हा नेते रमेश गायकवाड, लॉरेन्स स्वामी, अजय साळवे, किरण दाभाडे, विजय भांबळ आदी रिपाईचे पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.


सोमवारी केंद्रीय राज्य मंत्री ना. रामदास आठवले दिल्ली येथून शिर्डीला विमानाने 12 वाजता येणार आहे. शिर्डीनंतर श्रीरामपूर येथे भिमा बागुल यांच्या कुटुंबीयांची सांत्वनपर भेट घेणार आहे. त्यानंतर दुपारी 3 वाजता शहरातील शासकीय विश्रामगृह येथे त्यांचे आगमन होऊन ते पत्रकारांशी संवाद साधणार आहे. तर 4 वाजता संविधान सन्मान महामेळाव्यास हजेरी लावणार असल्याची माहिती साळवे यांनी दिली.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *