शिवसेनेच्या पाठपुराव्याला यश
खड्डेमुक्त रस्त्यामुळे ग्रामस्थांना दिलासा
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- अरणगाव ते बाबुर्डी घुमट (ता. नगर) या महत्त्वाच्या रस्त्यावरील खड्डेमय परिस्थितीमुळे नागरिक त्रस्त झाले असताना शिवसेनेच्या माध्यमातून करण्यात आलेल्या पाठपुराव्याने सदर रस्त्याच्या पॅचिंगला सुरुवात झाली आहे.
अरणगाव ते बाबुर्डी घुमट दुरुस्तीअभावी झालेली रस्त्याची दुर्दशा, पावसाळ्यात वाढलेले मोठमोठे खड्डे व धुळीचे साम्राज्य यामुळे या मार्गावरील वाहतूक धोकादायक बनली होती. वाढते अपघात, वाहनांचे नुकसान, विद्यार्थ्यांच्या शाळेतील प्रवासातील अडचणी आणि शेतमाल वाहतुकीतील अडथळे हे गंभीर प्रश्न रोजचे झाले होते.
या समस्येवर तोडगा काढण्यासाठी शिवसेनेच्या वतीने उपजिल्हाप्रमुख आनंद शेळके तसेच शिवसेना अनुसूचित जाती विभाग जिल्हाप्रमुख विनोद साळवे यांनी जिल्हाधिकारी आणि सार्वजनिक बांधकाम विभागाकडे निवेदनाद्वारे सातत्याने पाठपुरावा केला होता. रस्त्याची तातडीने दुरुस्ती न झाल्यास रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशाराही देण्यात आला होता. शिवसेनेच्या भूमिकेची प्रशासनाने दखल घेत अखेर सार्वजनिक बांधकाम विभागाकडून रस्त्याच्या पॅचिंग कामाला सुरुवात करण्यात आली आहे. या कामामुळे नागरिकांमध्ये दिलासा निर्माण झाला असून अनेक ग्रामस्थांनी शिवसेनेच्या या पुढाकाराचे स्वागत केले आहे.
विनोद साळवे म्हणाले की, शिवसेना नेहमीच सर्वसामान्यांच्या प्रश्नांसाठी लढत आली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली विकासकामांना वेग येत आहे. रस्त्याच्या दुरुस्तीचा प्रश्न सोडविण्यात यश आले असून, पुढेही नागरिकांच्या अडचणी दूर करण्यासाठी संघटनेचे सर्व पदाधिकारी कटिबद्ध आहेत.
पॅचिंग कामाची प्रत्यक्ष सुरुवात झाल्याने ग्रामस्थांनी आनंद व्यक्त केला आहे. रस्त्याचे काम पूर्ण झाल्यावर या मार्गावरील वाहतुकीची पूर्ववत सोय होऊन अपघात व अडचणी कमी होण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.
