• Tue. Jun 23rd, 2026

Mirrornews24

Marathi News

स्वप्न मोठी ठेवा आणि ती पूर्ण करण्याची जिद्दही मोठी ठेवा! -प्रसाद शिंदे

ByMirror

Feb 13, 2026
भविष्यातील वाटा आणि करियरबद्दल मार्गदर्शन

भिंगार येथील ॲबट हायस्कूलमध्ये दहावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी शुभेच्छा


भविष्यातील वाटा आणि करियरबद्दल मार्गदर्शन

अहिल्यानगर (प्रतिनिधी)- “स्वप्न मोठी ठेवा आणि ती पूर्ण करण्याची जिद्दही मोठी ठेवा!” परिश्रमाला कधीही पर्याय नसतो. यश अचानक मिळत नाही; ते घाम, चिकाटी आणि सातत्याने केलेल्या प्रयत्नांतून मिळते. तुमच्या शिक्षकांनी आणि पालकांनी अथक परिश्रम घेतले आहेत. त्या परिश्रमांची जाणीव ठेवा आणि त्यांच्या अपेक्षांना न्याय द्या. स्वतःवर विश्‍वास ठेवण्याचे आवाहन शिक्षक नेते महाराष्ट्र राज्य शिक्षक शिक्षकेतर शिक्षक सेना जिल्हाध्यक्ष प्रसाद शिंदे यांनी केले.


रयत शिक्षण संस्थेच्या श्रीमती ॲबट मायादेवी गुरुदित्ताशाह हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज भिंगार येथे दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना प्रसाद शिंदे बोलत होते. यावेळी माध्यमचे प्रतिनिधी प्रसाद शिंदे हे देखील उपस्थित होते.


पुढे शिंदे म्हणाले की, परिस्थिती कितीही कठीण असली तरी “मी करू शकतो” ही भावना मनात ठेवा. अपयश आले तरी खचू नका. अपयश म्हणजे शेवट नसतो; तो यशाकडे जाणारा मार्ग असतो. जीवनात कितीही मोठे व्हा, पण माणुसकी आणि प्रामाणिकपणा सोडू नका. ज्ञान मिळवताना संस्कार जपणे तितकेच आवश्‍यक आहे. तुमच्या वर्तनातून तुमच्या शाळेचे, कुटुंबाचे आणि समाजाचे नाव उज्ज्वल झाले पाहिजे या दृष्टीने वाटचाल करण्याचे त्यांनी सांगितले.


मोठी स्वप्ने बघा! डॉक्टर, इंजिनिअर, अधिकारी, उद्योजक, कलाकार कोणतेही क्षेत्र निवडा; पण त्यात उत्कृष्टतेचा ध्यास ठेवा. स्पर्धेच्या या युगात केवळ गुण नव्हे, तर कौशल्य, संवादकौशल्य आणि सकारात्मक दृष्टिकोनही महत्त्वाचा असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.


उत्साहपूर्ण आणि भावनिक वातावरणात दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ उत्साहात पार पडला. यावेळी विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी शुभेच्छा देऊन भविष्यातील करियरबद्दल मार्गदर्शन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य प्रमोद तोरणे उपस्थित होते.


कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन आणि सरस्वती पूजनाने करण्यात आली. यानंतर विद्यार्थ्यांनी स्वागतगीत सादर केले. दहावीच्या विद्यार्थ्यांनी आपल्या शालेय आठवणींना उजाळा देत भावना व्यक्त केल्या. काही विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त करत शिक्षकांप्रती कृतज्ञता व्यक्त केली. प्राचार्य प्रमोद तोरणे, प्राथमिक चे मुख्याध्यापक नारायण अनुभुले यांनी व इतर शिक्षकांनीही विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *