• Wed. Jun 24th, 2026

Mirrornews24

Marathi News

नेताजी स्वातंत्र्य संग्रामाचे महानायक ठरले -संकल्प शुक्ला

ByMirror

Jan 26, 2025
नेताजी सुभाषचंद्र भोस यांची जयंती पराक्रम दिवस म्हणून साजरी

नेताजी सुभाषचंद्र भोस यांची जयंती पराक्रम दिवस म्हणून साजरी

नेहरु युवा केंद्राचा उपक्रम; युवक-युवतींना नेताजींच्या विचारांनी केले प्रेरित

नगर (प्रतिनिधी)- ब्रिटिशांच्या सत्तेविरुद्ध उघडपणे आव्हान देणारे नेताजी सुभाषचंद्र भोस स्वातंत्र्य संग्रामाचे महानायक ठरले. देशाला स्वातंत्र्य मिळविण्यासाठी त्यांनी प्रयत्नांची पराकाष्टा केली. त्यांच्या त्यागाची आठवण सर्व भारतीयांनी ठेवावी. त्यांच्या ज्वाजल्य देशभक्तीची प्रेरणा घेऊन आजच्या युवकांनी देश सेवेला प्राधान्य दिले पाहिजे, असे प्रतिपादन नेहरु युवा केंद्राचे जिल्हा समन्वय अधिकारी संकल्प शुक्ला यांनी केले.


भारत सरकारच्या नेहरु युवा केंद्र माय भारत अंतर्गत नेताजी सुभाषचंद्र भोस यांची जयंती शासकीय परिचर्या महाविद्यालयात साजरी करण्यात आली. या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून शुक्ला बोलत होते. यावेळी परिचर्या महाविद्यालयाच्या प्राचार्या वैशाली कोरडे, अनंत द्रविड, राष्ट्रीय सेवा कर्मी दिनेश शिंदे, जयेश शिंदे, तुषार शेंडगे आदी उपस्थित होते.


प्रारंभी नेताजी सुभाषचंद्र भोस यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून मार्गदर्शन शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. प्राचार्य वैशाली कोरडे म्हणाल्या की, नेताजी सुभाषचंद्र भोस यांनी भारताच्या स्वातंत्र्यासाठी निस्वार्थ समर्पण केले. त्यांनी इंग्लंडमधील केंब्रिज विद्यापीठात प्रवेश घेऊन भारतीय सिव्हिल सर्व्हिस मध्ये चौथ्या क्रमांकाने उत्तीर्ण झाले. मात्र त्यांनी स्वातंत्र्य लढ्यात समर्पित राहण्यासाठी ही नोकरी सोडून देश सेवेला प्राधान्य दिल्याचे त्यांनी सांगितले.


दिनेश शिंदे म्हणाले की, नेताजींनी तुम्ही मला रक्त, मी तुम्हाला स्वातंत्र्य देतो! असे आवाहन करून स्वातंत्र्य लढ्यात सहभागी होण्यासाठी लाखो भारतीयांना प्रेरित केले. स्वातंत्र्य आणि स्वराज्याचा संदेश पसरविण्यासाठी त्यांनी स्वराज्य नावाचे वृत्तपत्र सुरू केले. त्यांनी द इंडियन स्ट्रगल नावाचे पुस्तक लिहिले व आझाद हिंद सेनेची स्थापना करुन स्वातंत्र्य संग्रामाला बळ दिले. प्रतिष्ठित वकील असतानाही त्यांनी आपल्या ज्ञानाचा उपयोग देशाला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी केला. त्यांच्या या कार्याचा युवकांनी आदर्श व प्रेरणा घेण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.


कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनंत द्रविड यांनी केले. आभार जयेश शिंदे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी जय युवा अकॅडमीचे सहकार्य लाभले. यावेळी परिचारिका प्रशिक्षणाच्या युवतींनी नेताजी सुभाषचंद्र भोस यांच्या जीवनावर भाषणे केली.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *