• Wed. Jul 2nd, 2025

नवनगरीसूर व ताल दिंडीच्या संगीत मैफलीला नगरकरांचा हाऊसफुल्ल प्रतिसाद

ByMirror

Sep 2, 2024

बासरी, तबला, हार्मोनियम, पखवाज, गायन यांच्या एकत्रीत कलाविष्काराने रसिक भारावले

अहमदनगर (प्रतिनिधी)- पुनीत बालन ग्रुप सादर तालचक्र (पुणे) व अनाहत एक कलासृष्टी (अ.नगर) यांच्या संयुक्त विद्यमाने शहरात नगरच्या कलाकारांनी सादर केलेल्या नवनगरी सूर व पद्मश्री पंडित विजयजी घाटे यांच्या संकल्पनेतून सादर झालेल्या ताल दिंडीला नगरकर रसिकांचा उदंड प्रतिसाद मिळाला.


न्यू टिळक रोड येथील नंदनवन लॉन्स मध्ये झालेल्या मैफलीत पूर्वार्धात नवनगरी सूर या कार्यक्रमात स्वतः संगीतबद्ध केलेल्या रचनांचे सादरीकरण नगरचे कलाकार सुफी गायक पवन नाईक व सुप्रसिद्ध मानसोपचार तज्ञ डॉ. नीरज करंदीकर यांनी आपल्या दमदार आवाजात केले. त्यांना संकेत सुवर्णपाठकी, कुलदीप चव्हाण, दिलावर शेख, आनंद मकासरे, शेखर दरवडे, हर्षद भावे, मुलांशु परदेशी, श्रेयस शित्रे, पवन तळेकर, नवरतन वर्मा, निनाद पारखी, सुनील कात्रे, संकेत गांधी यांची साथसंगत लाभली.


जात पात धर्म अभंगी बुडाले…. अभंगानी जपले माणुसपण! या अभंगातून समतेचा विचार मांडण्यात आला. गझलच्या विश्‍वात रममाण होताना डॉ. नीरज करंदीकर यांनी सखे छेड आता असे सूर काही…. पुन्हा पौर्णिमेची अशी रात्र नाही… या सादरीकरणाने उपस्थित श्रोत्यांना प्रेमाच्या विश्‍वात घेऊन गेले. तर पंजाबी गीत मधून सुफी गीत गायन करताना पवन नाईक यांनी आजा सजना… तैनू ऑखिया उडी… या जुगलबंदीने श्रोत्यांची वाहवाह मिळवली.


दुसऱ्या सत्रात पं. विजयजी घाटे यांच्या संकल्पनेतून सादर झालेला ताल दिंडीने श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले. बासरी, तबला, हार्मोनियम, पखवाज, गायन यांच्या एकत्रीत कलाविष्काराने सादर झालेल्या अभंग गायनाची मैफल बहरत गेली. या संगीतमय कार्यक्रमाला सुप्रसिद्ध बासरीवादक अमरजी ओक, पखवाज वादक ओंकार दळवी, संवादिनी वादक अभिषेक शिनकर, सुप्रसिद्ध नृत्यांगना शीतल कोलवालकर, तबला वादक सागर पटोकर, युवा पिढीतील आश्‍वासक गायक सुरंजन खंडाळकर आणि विनय रामदासन यांची साथसंगत लाभली.

पं. विजयजी घाटे यांच्या तबला वादनाने संगीत कार्यक्रमात रंग भरला होता. ताल दिंडी कार्यक्रमाची सुरुवात राग यमनने झाली . श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी…. या भक्तीगीताने संपूर्ण लॉन भक्तीमय बनले होते. टाळ्यांच्या कडकडाटात रसिक श्रोत्यांनी दाद दिली. शास्त्रीय संगीतातील प्रकार असलेल्या हवेली संगीताचे सादरीकरण हे माई मेरो मन सावरे…या गीताने झाले. तबला आणि पखवाजच्या जुगलबंदीला रसिकांची विशेष दाद मिळाली.


संपूर्ण लॉन रसिक श्रोत्यांनी भरले होते. तसेच नगरचे भूषण असलेले नाट्य अभिनेते तथा प्रसिद्ध निवेदक प्रसाद बेडेकर आणि बाल शंकर महाराज या भूमिकेने रसिकप्रिय झालेला आरुष बेडेकर यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून पद्मश्री पं. विजयजी घाटे, आमदार संग्राम जगताप, ब्रिगेडियर राजेश शर्मा, प्राचार्या नूतन मिश्रा, डॉ.एस.एस. दीपक, ज्योती दीपक, डॉ. दीप्ती करंदीकर, लोकमान्यच्या सौ. स्वस्तिश्री गरुड, डॉ. रावसाहेब बोरुडे, डॉ. स्मिता पटारे, लेफ्टीनंट सदाशिव भोळेकर, शिंगवी ज्वेलर्सचे गुंजन शिंगवी, भनसाळी शोरूमचे अभिजित भनसाळी आदी मान्यवर उपस्थित होते. डॉ. हृषीकेश कुलकर्णी, सौ. अमृता बेडेकर, तन्मयी भावे, माणिक देव, प्रसाद बेडेकर यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. ध्वनी व्यवस्था अवधूत गुरव यांची होती. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी अनाहतच्या सर्व पदाधिकारी आणि नियोजन समिती सदस्यांनी परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *